Join us

महापालिकेच्या घनकचरा ट्रकने डिलिव्हरी बॉयला चिरडले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 13:09 IST

अंधेरी येथील घटना; ओशिवरा पोलिस ठाण्यात चालकावर गुन्हा दाखल

मुंबई : महापालिकेच्या घनकचरा वाहनाखाली (मिनी कॉम्पॅक्टर) चिरडून अजीम शेख (वय ३५) या डिलिव्हरी बॉयचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री अंधेरीत घडली. याप्रकरणी ओशिवरा पोलिसांनी वाहनचालक प्रकाश यादव (४०) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. 

अंधेरी पश्चिमेकडील मस्जिद अल सलाम चौकात मंगळवारी मध्यरात्रीनंतर १ वाजता गस्तीवरील ओशिवरा पोलिसांना गर्दी दिसली. तेथे त्यांनी पाहिले असता एका दुचाकीशेजारी चालक जखमी अवस्थेत पडलेला त्यांना दिसला. चौकशीदरम्यान त्याचे नाव अजीम असून, तो ‘ब्लिंक इट’ कंपनीमध्ये डिलिव्हरी बॉय म्हणून काम करीत असल्याची माहिती तेथे उपस्थित असलेल्या दीपक पटेल (वय २५) याने पोलिसांना दिली. तेथेच उभे असलेले घनकचरा वाहन शेखच्या डोक्यावरून गेल्याचे स्थानिकांनी सांगितले. त्या वाहनाचा चालक यादव याला पोलिस ठाण्यात नेले, तर जखमी तरुणाला उपचारासाठी कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे डॉक्टरने त्याला तपासून दाखल पूर्व मृत घोषित केले. याप्रकरणी यादवला ताब्यात घेतले असून, त्याच्याविरोधात बीएनएस कायद्याचे कलम १०६, २८१ तसेच मोटार वाहन अधिनियम कलम १८४ अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. 

टॅग्स :गुन्हेगारीअंधेरीमुंबई पोलीस