Join us  

वरळीतील मालमत्ता कर वसुलीत १०० कोटींचा घोटाळा; काँग्रेसचा आरोप, सरकारला घरचा आहेर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2021 3:38 PM

कोट्यवधी रुपयांची मालमत्ता, कर प्रत्यक्षात फक्त काही लाखात वसूल झाला असल्याचा आरोप रवी राजा यांनी केला आहे. (BMC Opposition Leader Ravi Raja has claimed that the scam is worth Rs 700 to 800 crore in Mumbai)

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात १०० कोटींच्या खंडणीचा मुद्दा गाजत असताना मुंबई महापालिकेच्या कर निर्धारण व संकलन विभागातील काही अधिकाऱ्यांच्या संगनमताने कोट्यवधी रुपयांचा घोटाळा सुरू असल्याचा खळबळजनक आरोप काँग्रेस नेते विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केला आहे. 

मालमत्ता कराच्या वसुलीसाठी महापालिकेने तीव्र कारवाई सुरू केली आहे. जी दक्षिण विभागातील वरळी, परळ या भागात अनेक ठिकाणी मिलच्या मोक्याच्या व व्यावसायिक जागा आहेत. या मिल मालकांकडून मालमत्ता करापोटी महापालिकेला कोट्यवधी रुपये येणे आहे. मात्र अधिकारी मालमत्ता कर आकारणी करताना व त्यांची देयके संबंधित जागा मालकांना पाठवताना त्यांच्या जागेचे आकारमान व त्यांचे मूल्य कमी दाखवतात. त्यामुळे त्यांचा मालमत्ता कर हा काही कोटींऐवजी काही लाखांत आकारला जातो. याचा मोठा आर्थिक फटका पालिकेला बसत असून संबंधित पालिका अधिकारी गब्बर होत असल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे.

वरळी भागात मालमत्ता कर वसुलीत १०० कोटींचा, तर संपूर्ण मुंबईत ७०० ते ८०० कोटी रुपयांचा हा घोटाळा असल्याचा दावा रवी राजा यांनी केला. या प्रकरणाची चौकशी करून संबंधित दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी आयुक्त इक्बालसिंह चहल यांच्याकडे केली आहे. जागा मालक, पालिका अधिकारी यांच्या संगनमताने हा ७००-८०० कोटींचा मालमत्ता कर वसूली घोटाळा झाला असून कोट्यवधी रुपयांची मालमत्ता, कर प्रत्यक्षात फक्त काही लाखात वसूल झाला असल्याचा आरोप रवी राजा यांनी केला आहे. (BMC Opposition Leader Ravi Raja has claimed that the scam is worth Rs 700 to 800 crore in Mumbai)

राज्यात शिवसेनेबरोबर सत्तेत असतानाही महापालिकेत मात्र काँग्रेसने शिवसेनेवर निशाणा साधला. शिवसेनेचा प्रशासनावर अंकुशच राहिलेला नाही, त्यामुळे कर्मचारी असे घोटाळे करीत आहेत. पालिकेत चांगले काही काम झाले तर त्याचे श्रेय स्वतः घेतात, स्वतःची पाठ थोपटतात. त्याप्रमाणे ही जबाबदारीही सत्ताधाऱ्यांचीच आहे. विरोधी पक्षात असल्याने मुंबईकरांच्या भल्यासाठी असे भ्रष्टाचार उकरून काढतच राहू, असा इशारा देखील रवी राजा यांनी सत्ताधाऱ्यांना दिला. 

टॅग्स :मुंबई महानगरपालिकाकाँग्रेसशिवसेनामहाराष्ट्र सरकार