औषधे खरेदीत पालिकेचे कोट्यवधींचे नुकसान?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2025 12:54 IST2025-01-16T12:54:09+5:302025-01-16T12:54:18+5:30

पत्रात नुकसानीची माहिती नसल्याची पालिकेकडून सारवासारव 

BMC loses crores in medicine purchase? The municipality denies that there is any information about the loss in the letter. | औषधे खरेदीत पालिकेचे कोट्यवधींचे नुकसान?

औषधे खरेदीत पालिकेचे कोट्यवधींचे नुकसान?

मुंबई : महापालिकेने औषध पुरवठ्याबाबत दर कराराचे नूतनीकरण न केल्याने पालिकेला एक रुपयात मिळणारे औषध १० रुपयांना खरेदी करावे लागत आहे. दरनिश्चिती करून टेंडर न काढल्याने तीन वर्षांत पालिकेला  ५० ते ६० कोटी रुपयांचे नुकसान झाले असल्याचा दावा फूड अँड ड्रग्ज लायसन्स होल्डर फाउंडेशनचे अध्यक्ष अभय पांडे यांनी केला आहे. मात्र, पुरवठादारांनी दिलेल्या पत्रात याबाबतची माहिती नसल्याने नुकसानीबाबत काही सांगता येणार नसल्याचे  पालिकेच्या आरोग्य उपायुक्तांनी सांगितले. 

पालिकेतील दवाखाने आणि रुग्णालयांना औषध पुरवठा करण्यासाठी आवश्यक दर करारपत्र चार वर्षांपूर्वीच संपुष्टात आले आहे. पालिकेने नव्याने दर करार पत्र तयार न केल्याने औषध वितरकांकडून वाढीव दराने औषध पुरवठा केला जात आहे. त्यामुळे गेल्या  तीन वर्षांपासून दर करार निश्चित करून टेंडर काढले गेले नाही. खरेदी विभागाने, याकडे दुर्लक्ष केल्याने पालिकेची झीरो प्रिस्क्रिप्शन पॉलिसी कागदावरच राहिल्याचा आराेप पांडे यांनी केला आहे.

 ...तरीही औषध पुरवठा करणार 
पालिकेने नुकत्याच  दिलेल्या आश्वासनानुसार कंत्राटदारांची देयके काढण्याचा कामाला सुरुवात झाली आहे. त्याला अजून काही कालावधी लागेल. 
आम्ही देयकांसाठी मागील साडेचार वर्षे थांबलो, अजून काही दिवस वाट पाहायला तयार आहोत. त्यामुळे सध्या सुरू असलेला औषध पुरवठा खंडित करणार नसल्याचे पांडे यांनी स्पष्ट केले आहे.

औषध खरेदीचा दर करार न झाल्यामुळे पालिकेचे किती नुकसान होत आहे, याबाबत औषध पुरवठादारांनी आमच्याकडे दिलेल्या पत्रात कोणतीही माहिती नाही. त्यामुळे त्याबाबत काहीही सांगता येणार नाही, फक्त औषध पुरवठा खंडित करण्याबाबत त्यांनी पत्र लिहिले होते, आता चर्चेनंतर आम्ही त्यांची देयके देण्यास सुरुवात केल्याने तो काही प्रश्न नाही.
संजय कुऱ्हाडे, उपायुक्त, आरोग्य विभाग   

Web Title: BMC loses crores in medicine purchase? The municipality denies that there is any information about the loss in the letter.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.