दीड कोटीत कोळीवाडा होणार चकाचक
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2025 12:55 IST2025-10-26T12:54:02+5:302025-10-26T12:55:30+5:30
साडेतीन किलोमीटर लांबीचा किनारपट्टी परिसर स्वच्छतेसाठी मुंबई महानगरपालिकेचा पुढाकार

दीड कोटीत कोळीवाडा होणार चकाचक
मुंबई : मुंबईतील महत्त्वाचे पर्यटनस्थळ आणि मच्छिमार व्यवसाय केंद्र असलेल्या वरळी कोळीवाडा समुद्रकिनारा वर्षभर चकाचक राहणार आहे. यासाठी महानगरपालिकेच्या वतीने नुकतीच नवीन कंत्राटदाराची निवड करण्यात आली असून, त्यासाठी वर्षाला १.४४ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.
यापूर्वी नियुक्त केलेल्या कंत्राटदाराचा कालावधी संपुष्टात आल्यानंतर पालिकेने नव्याने निविदा मागवून कंपनीची निवड केली आहे. कंपनीला एक वर्षाच्या कालावधीकरिता हे काम सोपविण्यात आले असून, विविध करांसह इतका खर्च केला जाणार आहे. वरळी चौपाटीचा सुमारे साडेतीन किलोमीटर लांबीचा किनारपट्टीचा परिसर स्वच्छ आणि चकाचक ठेवण्यासाठी हा करार केला आहे.
'स्किड स्टीयर लोडर'चा वापर
महानगरपालिकेच्या १ जी/दक्षिण विभागातील हा समुद्रकिनारा स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी नवीन कंत्राटदारावर असेल.
या स्वच्छतेच्या २ कामासाठी मनुष्यबळ, स्किड स्टीयर लोडर मशीन व ई-ऑटो वाहनांद्वारे कचरा गोळा करून तो डम्पिंग ग्राऊंड येथे वाहून नेण्यात येणार आहे.
समुद्रकिनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात डेब्रिजमिश्रित कचरा
वरळी कोळीवाडा समुद्रकिनारा हा पर्यटकांची मोठी गर्दी खेचणारा भाग आहे. त्याचबरोबर येथे आजही मच्छिमारी व्यवसाय चालतो. पर्यटन तसेच अन्य कारणामुळे या समुद्र किनाऱ्यावर कचऱ्याचे प्रमाण वाढते. तसेच भरती-ओहोटीच्या वेळी समुद्रातून वाळू, गाळ, माती आणि डेब्रिजमिश्रित कचरा मोठ्या प्रमाणावर किनाऱ्यावर जमा होत असतो. या कचऱ्याची वेळेवर साफसफाई करणे अत्यंत गरजेचे असते.
शहर स्वच्छतेसाठी मुंबई महानगरपालिका प्रशासन कायम सतर्क असते. आता एक पाउल पुढे टाकत समुद्रकिनारा स्वच्छतेसाठी महानगरपालिकेने पुढाकार घेतला आहे
४३ रुपयांची दररोज बचत
स्वच्छतेच्या कामात पालिकेने थोडीशी आर्थिक बचत केल्याचे दिसून येत आहे. मागील वर्षी याच चौपाटीवरील साफसफाईसाठी एका दिवसाचा खर्च २८ हजार ६५० रुपये एवढा होता, तर आता नवीन कंत्राटांतर्गत एका दिवसाचा खर्च केवळ ४३ रुपयांनी कमी होऊन अठ्ठावीस हजार सहाशे सात रुपये एवढा आकारण्यात आला आहे.