मुंबईत MIMच्या तिकिटावर निवडून आलेला एकमेव हिंदू नगरसेवक कोण? आता विजयाची होतेय चर्चा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2026 15:17 IST2026-01-19T15:14:04+5:302026-01-19T15:17:28+5:30
BMC Elections 2026 Result: गेल्या आठवड्याता झालेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये असदुद्दीन ओवेसा यांच्या एमआयएमने दमदार कामगिरी केली होती. मुंबईमध्ये एमआयएमचे ८ उमेदवार निवडून आले. या आठ जणांपैकी एका उमेदवाराच्या विजयाची आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

मुंबईत MIMच्या तिकिटावर निवडून आलेला एकमेव हिंदू नगरसेवक कोण? आता विजयाची होतेय चर्चा...
गेल्या आठवड्याता झालेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये असदुद्दीन ओवेसा यांच्या एमआयएमने दमदार कामगिरी केली होती. मुंबईमध्ये एमआयएमचे ८ उमेदवार निवडून आले. या आठ जणांपैकी एका उमेदवाराच्या विजयाची आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. ते विजयी उमेदवार म्हणजे विजय उबाळे. विजय उबाळे हे मुस्लिमांचा पक्ष अशी ओळख असलेल्या एमआयएमकडून निवडणूक लढवून विजयी झाले आहे. तसेच एमआयएमचे मुंबईत विजयी झालेले ते एकमेव हिंदू नगरसेवक ठरले आहेत.
विजय उबाळे यांनी गोवंडीमधील मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १४० मधून विजय मिळावला. बहुतांश मुस्लिम आणि हिंदू मतदार असलेल्या या मतदारसंघात विजय उबाळे यांनी ४ हजार ९४५ मते मिळवत विजय मिळवला. येथे अनेक उमेदवार रिंगणात असल्याने मोठ्या प्रमाणात मतविभाजन झाले. या मतविभाजनाचा फायदा उबाळे यांना झाला आणि अटीतटीच्या लढतीत त्यांनी विजयश्री खेचून आणली.
उच्चशिक्षित असलेले विजय उबाळे हे पेशाने शिक्षक असून, ते खाजगी शिकवणीचे वर्ग चालवतात. दीड वर्षांपूर्वी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीदरम्यान, उबाळे हे एमआयएममध्ये दाखल झाले होते. तसेच त्यांना मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी एमआयएमने त्यांना उमेदवारी जाहीर केली. मात्र निवडणूक लढवण्यासाठी त्यांच्याकडे पुरेसे पैसे नव्हते. मात्र उधारीवर पैसे घेऊन ते निवडणूक लढले आणि त्यात ते विजयीदेखील झाले.
दरम्यान, मुंबईमध्ये एमआयएमचे विजयी झालेले सर्व उमेदवार हे मुस्लिमबहूल असलेल्या गोवंडी परिसरातील आहेत. तसेच विजय उबाळेंचा अपवाद वगळता एमआयएमचे विजयी झालेले उमेदवार हे मुस्लिम आहेत. त्याशिवाय या महानगरपालिका निवडणुकीत राज्यभरात १२५ नगरसेवक निवडणून आणत एमआयएमने आपण महाराष्ट्रातील दखलपात्र पक्ष असल्याचे दाखवून दिले आहे.