Join us
Daily Top 2Weekly Top 5

BMC Elections 2026 Result: मुंबई महानगरपालिकेत भाजप-शिंदेसेनेची नोंदणी स्वतंत्र गट म्हणूनच, समोर येतंय असं कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2026 10:59 IST

BMC Elections 2026 Result: मुंबई महापालिकेत वैधानिक आणि विशेष समित्यांच्या सदस्य संख्येवरून उलटसुलट चर्चा सुरू झाल्याने भाजप आणि शिंदेसेना यांचा संयुक्त गट म्हणून कोकण आयुक्तांकडे नोंदणी होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत होती.

- सुजित महामूलकरमुंबई  - मुंबई महापालिकेत वैधानिक आणि विशेष समित्यांच्या सदस्य संख्येवरून उलटसुलट चर्चा सुरू झाल्याने भाजप आणि शिंदेसेना यांचा संयुक्त गट म्हणून कोकण आयुक्तांकडे नोंदणी होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र, शिंदेसेनेला पुढील पाच वर्षे महापालिकेत भाजपचेच धोरण अवलंबावे लागेल. यामुळे महापालिकेतून शिंदेसेनेचे स्वतंत्र अस्तित्व नष्ट होण्याचा धोका लक्षात घेता स्वतंत्र पक्ष म्हणून नोंदणी करणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून देण्यात आली आहे.

निकाल लागून १० दिवस उलटले. मात्र, बहुमत मिळालेल्या भाजप-शिंदेसेनेच्या युतीने अद्याप कोकण आयुक्तांकडे गट नोंदणी केलेली नाही. महापौरपद, उपमहापौरपद, विविध वैधानिक व विशेष समित्या यांचे अध्यक्षपद आणि सदस्यत्व यावर भाजप-शिंदेसेनेच्या नेत्यांमध्ये खल होत होता. त्यात पालिका तिजोरीच्या चाव्या असणाऱ्या स्थायी समितीत सत्ताधारी व विरोधी पक्षाची सदस्यसंख्या सम-समान येत असल्याने विरोधकांची कमी करून सत्तापक्षाची सदस्यसंख्या कशी वाढवता येईल, यावर अभ्यास सुरू होता. शिक्षण समितीचे अध्यक्ष हे स्थायी समितीवर पदसिद्ध सदस्य असल्याने केवळ एका आकड्याने सत्ताधारी वरचढ आहेत. शिक्षण समिती अध्यक्ष वगळता सत्ताधारी व विरोधकांचे १३-१३ सदस्य स्थायी समितीवर सदस्य म्हणून जातील.

...तर सत्ताधारी पक्षाचा एक सदस्य वाढेलसंयुक्त नोंदणी झाल्यास गुणोत्तर प्रमाण वाढून सत्ताधारी पक्षाचा एक सदस्य वाढू शकतो. मात्र, संयुक्त नोंदणीनंतर भाजप-शिंदेसेनेचा गटनेता एकच असेल. महापालिका सभागृहात आणि अन्य सर्व समित्यांमध्ये जी भूमिका भाजप घेईल त्याला समर्थन देणे शिंदेसेनेला बंधनकारक राहील.

याशिवाय दोन्ही पक्षांसाठी महापालिकेत स्वतंत्र नव्हे तर एकच कार्यालय मिळू शकेल. याशिवाय समित्यांवर शिंदेसेनेला किती प्रतिनिधित्व द्यायचे, याचा निर्णय घेण्याचा अधिकार भाजप गटनेत्याला असेल.

प्रतिनिधित्वाचा निर्णय भाजपकडेआज स्वतंत्र पक्ष म्हणून पक्षीय बलाबल गुणोत्तरानुसार स्थायी समितीवर भाजपचे ८ आणि शिंदेसेनेचे ३ सदस्य जाऊ शकतात. संयुक्त गट झाल्यास शिंदेसेनेच्या किती सदस्यांना प्रतिनिधित्व द्यायचे याचा निर्णय भाजपकडे राहील. यामुळे शिंदेसेन्याकडून स्वतंत्र गट म्हणून नोंदणी करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे कळते. आम्ही दोन्ही पक्ष नोंदणीसाठी कोकण भवनला एकत्र जाऊ, मात्र गट म्हणून नोंदणी वेगळी होईल, असे शिंदेसेनेच्या एका नेत्याने 'लोकमत'शी बोलताना स्पष्ट केले.

English
हिंदी सारांश
Web Title : BMC Elections 2026: BJP-Shinde Sena to Register as Separate Groups

Web Summary : BJP and Shinde Sena will register separately for BMC 2026 elections. Shinde Sena fears losing independent identity by merging with BJP. Representation decision lies with BJP in joint group.
टॅग्स :महाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६मुंबई महापालिका निवडणूक निकाल २०२६भाजपाशिवसेनामुंबई महानगरपालिका