-बाळकृष्ण परबराज्याची राजधानी, देशाची आर्थिक राजधानी आणि देशातील सर्वात मोठी महानगरपालिका असा लौकिक असलेल्या मुंबई महानगरपालिकेची यावेळची निवडणूक ही सर्वार्थाने लक्षवेधी ठरली. मुंबईत कायमच प्रभावी राहिलेला मराठी अस्मितेचा मुद्दा पुन्हा एकदा प्रभावी ठरणार का? पक्षात पडलेल्या फुटीनंतर उद्धव ठाकरे हे राज ठाकरेंच्या मनसेशी केलेल्या युतीच्या माध्यमातून आपल्या पक्षाची मुंबईतील ताकद कायम राखण्यात यशस्वी ठरणार का? मुंबईच्या विकासाचा मुद्दा घेऊन रिंगणात उतरलेल्या भाजपाच्या झंझावाती प्रचारासमोर ठाकरे ब्रँडचं काय होणार? असे एक ना अनेक प्रश्न या निवडणुकीच्या निमित्ताने मुंबईतील सर्वसामान्य मतदारांसह राजकीय अभ्यासक देशभरातील राजकीय वर्तुळाला पडले होते. परवा लागलेल्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या निकालामधून यापैकी अनेक प्रश्नांची उत्तरं मिळाली. अत्यंत चुरशीच्या झालेल्या मुंबई महानगपालिकेच्या या निवडणुकीमध्ये अखेरीस भाजपा आणि शिंदे गटाच्या महायुतीने काहीसं अडखळत का होईना बाजी मारत स्पष्ट बहुमत मिळवलं. तर ठाकरे बंधूंच्या युतीला पराभवाचा सामना करावा लागला. मात्र या पराभवानंतरही ठाकरे बंधूंनी दिलेली लढत आणि त्यांनी मिळवलेल्या लक्षणीय जागा ह्या चर्चेचा विषय ठरल्या आहेत.
मुंबई महानगरपालिकेच्या यावेळच्या निवडणुकीत एकीकडे मराठी अस्मितेचा मुद्दा घेऊन २० वर्षांनंतर एकत्र आलेले ठाकरे बंधू आणि दुसरीकडे केंद्र आणि राज्यातील सत्ता, निवडणूक जिंकण्यासाठीची अजस्र यंत्रणा आणि विकासाचा मुद्दा घेऊन रिंगणात उतरलेली भाजपा आणि शिंदेसेनेची महायुती यांच्यातच मुंबई जिंकण्यासाठीची मुख्य लढत रंगली होती. तर वंचितला सोबत घेऊन स्वतंत्र लढत असलेल्या काँग्रेसनेही या लढतीत रंगत आणल्याचं दिसत होतं. उद्धव आणि राज ठाकरे यांच्या मनोमिलनामुळे ठाकरे ब्रँडचं झालेलं ऐक्य, शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर शिवसेनेचं जन्मस्थान असलेल्या मुंबईतील मतदार काय कौल देतात, याकडेही सर्वांचं लक्ष होतं. या निवडणुकी ठाकरे बंधूंनी सुरुवातीपासूनच मराठी अस्मिता, मुंबईत मराठी माणसाची होत असलेली गळचेपी हे मुद्दे लावून धरले होते. तसेच शिवाजी पार्कवर झालेल्या ऐतिहासिक सभेमधून राज ठाकरे यांनी अदानी हे भाजपाच्या मदतीने मुंबईसह महाराष्ट्र आणि देशात उद्योगांमध्ये कशी एकाधिकारशाही निर्माण करताहेत हे सप्रमाण दाखवून दिले.
त्यात मराठीसाठी मुंबईत ठाकरेच हवेत, या मुद्द्यावरून सोशल मीडियावरून रान उठवण्यात आलं होतं. त्यामुळे ठाकरेंच्या बाजूने जबरदस्त वातावरण निर्मिती झाली होती. त्याचा परिणाम निकालांमध्ये दिसला आणि ठाकरे बंधूंची युती २२७ जागा असलेल्या मुंबई महानगरपालिकेमध्ये ७१-७२ जागांपर्यंत जाऊन पोहोचली. तर भाजपा आणि शिंदेसेनेच्या महायुतीला अडखळत धडपडत ११८ जागांपर्यंतच मजल मारता आली. मात्र मुंबईतील प्रभागा प्रभागातून ठाकरेंच्या उमेदवारांनी कडवी झुंज दिल्याने भाजपा आणि शिंदेसेनेची अंतिम निकाल हाती येईपर्यंत चांगलीच दमछाक झाल्याचे दिसून आले. त्यात पक्ष, चिन्ह, कार्यकर्ते, नेते सारं काही गमावलेल्या उद्धवसेनेने ६५ जागा जिंकणं लक्षणीय कामगिरी केली. तर राज्यातील सत्ता, प्रचंड यंत्रणा, बलाढ्य नेते सारं काही दिमतीला असूनही या महायुतीला विजय मिळाला पण अपेक्षित यश मिळालं नाही.
खरंतर मुंबई महानगपालिका निवडणुकीचं बिगुल वाजल्यानंतर यावेळी मुंबईतून ठाकरेंचं वर्चस्व संपणार, विकास आणि हिंदुत्वाच्या मुद्यावर मुंबईकर महायुतीच्या बाजूने उभे राहणार, ठाकरे ब्रँडचा बँड वाजणार, असे एक ना अनेक दावे भाजपा नेत्यांकडून केले जात होते. त्यात कोस्टल रोड, अटल सेतू, मेट्रो अशा मोठ्या प्रकल्पांमधून मुंबईच्या विकासासाठी भाजपा आणि महायुतीच कशी आवश्यक आहे, हे भाजपाचे नेते ठासून सांगत होते. या सर्वांचा मुंबईतील मतदारांवर प्रभावही पडला नाही असं नाही. पण केंद्रातील सत्ताधारी असलेल्या भाजपाच्या माध्यमातून मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचं षडयंत्र सुरू आहे. मराठी अस्मिता धोक्यात आली आहे. मुंबईत मराठी माणसांची जाणीवपूर्वक गळचेपी केली जात आहे. मुंबईला वाचवण्याची ही मराठी माणसाकडे शेवटी संधी आहे, असं ठाकरे बंधूंकडून करण्यात आलेलं आवाहन भाजपा आणि महायुतीच्या प्रचारापेक्षा अधिकच प्रभावी ठरल्याचं दिसून आलं. त्याामुळे मराठी बहूल भागातील मराठी मतदार हा ठाकरेंच्या मागे ठामपणे उभा राहिला. या भागांमधून ठाकरे बंधूंच्या पक्षांना चांगलं मतदान आणि भरभरून जागा मिळाल्याने मुंबईतील मराठी माणसाच्या मनात ठाकरे यांचं स्थान अद्यापही अढळ असल्याचं दिसून आलं.
मुंबईतील मराठी माणसाचे बालेकिल्ले असलेल्या लालबाग, परळ, शिवडी, दादर, वरळी, विक्रोळी, भांडुप, जोगेश्वरी अशा भागात ठाकरे बंधूंनी आपली ताकद दाखवली. तसेच मुंबई महानगरपालिकेच्या कारभारावर नियंत्रण राखण्याइतपत जागा मिळवल्या. त्यामुळे पराभव झाला असला तरी मुंबईतून ठाकरे आणि ठाकरे ब्रँड संपलेला नाही, हे स्पष्ट झाले आहे. त्याबरोबरच मुंबईमध्ये मराठीचा मुद्दा आणि ठाकरेंबद्दलचा आपलेपणा अजूनही कायम आहे, हेही या निकालांनी दाखवून दिलं आहे.
मुंबईतील ठाकरे ब्रँडची जादू कायम राहण्याचं आणि मराठीबहूल भागात ठाकरे बंधूंच्या पक्षांना घवघवीत यश मिळण्यामागचं मुख्य कारण म्हणजे बदलत्या मुंबईमध्ये मराठी माणसासाठी आवाज उठवण्याची आणि मराठी अस्मितेसाठी थेट रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याची ताकद ठाकरेंमध्येच आहेत असा ठाम विश्वास अजूनही या भागातील मराठी माणसांच्या मनात कायम आहे. तसेच ठाकरे आणि शिवसेना यांच्याशी मुंबईतील मराठी माणसाची जुळलेली भावनिक नाळ अजूनही कायम आहे. तसेच बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्या अखेरच्या भाषणातून माझ्या उद्धवला सांभाळा, माझ्या आदित्यला सांभाळा या केलेल्या भावनिक आवाहनाचा प्रभाव अजूनही इथल्या शिवसैनिकाच्या मनावर कायम आहे. त्यामुळे महानगपालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे ब्रँडचा बँड वाजणार, उद्धवसेना संपणार, असे दावे सत्ताधाऱ्यांकडून करण्यात येऊ लागल्यानंतर ही बाब ठाकरेंचा समर्थक असलेल्या मराठी माणसाला चेतवणारी ठरली. तसेच तो मतदानावेळी ठामपणे ठाकरेंच्या मागे उभा राहिला आणि त्याचा फायदा ठाकरे बंधूंच्या युतीला झाला.
मात्र आता भविष्यात मुंबईसह महाराष्ट्रामध्ये आगेकूच करायची असेल तर ठाकरे बंधूंना मेहनत घ्यावी लागणार आहे. सद्यस्थितीत काही मराठी पट्टा वगळता मुंबईतील ठाकरे बंधूंच्या वर्चस्वाला धक्का बसलाय, ही बाब विचारात घेऊन रणनीती आखावी लागेल, सातत्याने लोकांमध्ये मिसळावे लागेल. त्याबरोबरच मराठी अस्मितेसोबतच विकासाचे मुद्देही हाती घ्यावे लागतील, तरच काहीसा संकुचित झालेला ठाकरे ब्रँड पुन्हा मोठा होईल. तसेच केवळ मुंबईतच नाही तर महाराष्ट्रामध्येही प्रभावी होईल.
Web Summary : Mumbai saw a close election. Mahayuti secured a majority, but the Thackeray brand remains potent. Despite defeat, the Thackeray brothers' fight and seat count were noteworthy, showing their enduring influence, especially in Marathi-speaking areas.
Web Summary : मुंबई में कड़ी टक्कर हुई। महायुति को बहुमत मिला, पर ठाकरे ब्रांड मजबूत रहा। हार के बावजूद, ठाकरे भाइयों की लड़ाई और सीटों की संख्या उल्लेखनीय थी, जो मराठी भाषी क्षेत्रों में उनके स्थायी प्रभाव को दर्शाती है।