“विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करा’’, काँग्रेसची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 16:10 IST2026-01-02T15:54:08+5:302026-01-02T16:10:53+5:30
BMC Elections 2026: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे वर्तन आक्षेपार्ह व आदर्श आचारसंहितेचा भंग करणारे असल्याने त्यांच्यावर गुन्हे दाखल करून कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

“विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करा’’, काँग्रेसची मागणी
मुंबई - विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विरोधी पक्षांच्या उमेदवारांना अर्ज दाखल करताना धमकावल्याचा प्रकार अत्यंत गंभीर आहे. नार्वेकर यांचे वर्तन आक्षेपार्ह व आदर्श आचारसंहितेचा भंग करणारे असल्याने त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत तसेच त्यांच्या कार्यालयातील तब्बल ७० अधिकारी आणि कर्मचारी नार्वेकर यांचे नातेवाईक असलेल्या उमेदवारांच्या निवडणूक प्रचारात सक्रीय भाग घेत आहेत, या सर्वांवरही आचारसंहिता भंगाचे गुन्हे दाखल करून कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांना पत्र पाठवले असून या पत्रात सपकाळ म्हणाले की, मुंबईतील कुलाबा मतदार संघातील प्रभाग क्रमांक २२५, २२६ व २२७ मधून राहुल नार्वेकर यांचे भाऊ मकरंद नार्वेकर, बहिण गौरवी शिवलकर व वहिनी हर्षदा नार्वेकर या तिघांनी भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत, अर्ज दाखल करताना राहुल नार्वेकर हे स्वतः उपस्थित होते. सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असताना राहुल नार्वेकर यांनी पोलिसांच्या माध्यमातून भाजपा उमेदवारांच्या विरोधात अर्ज दाखल करणा-या विरोधी पक्षांच्या उमेदवारांना धमकावले तसेच अर्ज भरण्यापासून रोखण्यात आले, अशा प्रकारे एका महत्वाच्या व संवैधानिक पदावरील व्यक्तीने लोकशाहीचे धिंडवडे काढून निवडणूक प्रक्रियेत अडथळा आणला आहे. या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे.
सपकाळ पुढे म्हणाले की, लोकशाहीमध्ये निवडणूका निष्पक्ष, पारदर्शक आणि निर्भिड वातावरणात पार पाडणे हे आपल्या आयोगाचे कर्तव्यच आहे परंतु या निवडणुकांमध्ये विरोधी पक्षांच्या उमेदवारांवर हरप्रकारे दबाव आणून अर्ज मागे घेण्यास भाग पाडले जात असल्याच्या तक्रारी येत आहेत. यात सर्वात महत्वाचे म्हणजे विधानसभेचे विद्यमान अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विरोधी पक्षांच्या उमेदवारांचे अर्ज दाखल करुन घेऊ नये यासाठी प्रशासनावर दबाव आणला, विरोधी पक्षांच्या उमेदवारांना धमकावले हे अत्यंत गंभीर आहे. राहुल नार्वेकर हे संवैधानिक पदावर आहेत, त्यांच्याकडून अशापद्धतीने कायदा धाब्यावर बसून दडपशाहीचा मार्ग अवलंबणे लोकशाहीचा खून करण्यासारखे कृत्य आहे. महाराष्ट्रात कायद्याचे राज्य आहे, आणि निवडणूक आयोगाच्या पाठीचा कणा मजबूत आहे हे आपण दाखवून द्यावे असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.