Join us  

BMC Election: मोठी बातमी! शिवसेनेचा स्वबळाचा नारा; मुंबईत भाजपासह काँग्रेस-राष्ट्रवादीलाही देणार टक्कर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2021 8:57 AM

Shivsena Sanjay Raut Statement on BMC Election: मुंबई पालिकेत १०० पेक्षा जास्त जागा जिंकण्याची तयारी शिवसेनेने केली आहे.

मुंबई : आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत १०० पेक्षा अधिक जागा जिंकण्यासाठी आम्ही तयारी करत आहोत. मुंबईत शिवसेनेचा विस्तार व्हावा ही पक्षाची भूमिका कायम आहे म्हणून शिवसेना स्वबळावर लढत आहे. मागील पालिका निवडणूक ही आमच्या ताकदीवर लढल्याचे खासदार संजय राऊत यांनी शुक्रवारी स्पष्ट केले.

राज्यात जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत शिवसेना चौथ्या क्रमांकावर राहिली. या पार्श्वभूमीवर आगामी मुंबई पालिका निवडणुकीसाठी शिवसेनेच्या भूमिकेबद्दल राऊत म्हणाले की, मुंबईत शिवसेनेचा जन्म झाला आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेवर शिवसेनेचे राज्य नसेल तर कुणाचे राज्य असेल, असा दावा करतानाच पालिकेत शिवसेनेचाच महापौर असेल, असा दावाही त्यांनी केला. शिवसेनेच्या दसरा मेळाव्या संदर्भात राऊत म्हणाले की, यंदाचा दसरा मेळावा दणक्यात होईल. हा देखील सांस्कृतिक उत्सव आहे. मुख्यमंत्र्यांनीही दसरा मेळावा घेण्याचे ठरविले आहे. त्यादृष्टीने तयारी सुरू आहे. फटाके वगैरे फोडून जल्लोषात हा दसरा मेळावा होईल, असे राऊत म्हणाले.

मंदिरे उघडली आहेत, नियम पाळून सण साजरे होत आहेत. दसरा मेळावाही होईल, असे सांगतानाच मेळावा कुठे होणार हे आता सांगू शकत नाही, असेही राऊत म्हणाले. त्यामुळे यंदाचा शिवसेना मेळावा कुठे होणार याबाबत चर्चा सुरू आहे. मागील वर्षी दादर येथील राष्ट्रीय सावरकर स्मारकाच्या सभागृहात हा मेळावा झाला होता. तर, यंदा षण्मुखानंद सभागृहात शिवसेनेचा दसरा मेळावा आयोजित केला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :शिवसेनाकाँग्रेसराष्ट्रवादी काँग्रेसमुंबई महानगरपालिका