Join us
Daily Top 2Weekly Top 5

मराठी-अमराठीचे राजकारण करून वितुष्ट निर्माण करण्याचे दिवस आता संपले: देवेंद्र फडणवीस

By यदू जोशी | Updated: January 17, 2026 08:02 IST

BMC Election Results 2026: सब का साथ, सब का विकास... सर्वभाषकांचा सन्मान; महापालिकांसाठी एकात्मिक विकासाचे धोरण आणणार

यदु जोशी

मुंबई : गेल्या २५-३० वर्षांत मुंबईतून मराठी माणूस मोठ्या प्रमाणात हद्दपार झाला, आता ती वेळ त्यांच्यावर येणार नाही. आम्ही त्यांना मुंबईतच रोजगार देऊ आणि मुंबईतच हक्काचे घर देऊ, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. तसेच, मुंबईकरांना मराठी-अमराठीचे राजकारण करून त्यांच्यात वितुष्ट आणण्याचे दिवस आता संपले, मराठीजनांचा सन्मान राखणारच पण इतरांना हिणवले असे होणार नाहीच अशी ग्वाहीदेखील फडणवीस यांनी दिली.

राज्यातील महापालिकांच्या एकात्मिक विकासाचे धोरण आम्ही आणू, देशाच्या इतर भागात आणि जगातही महापालिकांमध्ये ज्या-ज्या आदर्श अशा योजना असतील त्या मुंबईसह राज्यातील महापालिकांध्ये नक्कीच आणू असे फडणवीस म्हणाले. मुंबईकर, पुणेकर असोत की नागपूरकर त्यांच्यासमोर निवडणुकीच्या काळात मी जी भाषणे दिली त्यात मी केवळ आणि केवळ विकासाचाच अजेंडा मांडलेला होता. तो भाषणांपुरता किंवा टाळ्या घेण्यापुरता नव्हता याची प्रचिती सर्वच महानगरांना नक्कीच येईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.या क्षणी मी, पक्षातील सगळे नेते, हजारो कार्यकर्ते अत्यानंदी आहोत. आजचा दिवस कोणावर टीका करण्याचा, उणेदुणे काढण्याचा नाही. निवडणुकीतही मला नाइलाजाने काही जणांवर टीका करावी लागली, कारण आधी समोरून टीकेचे बाण आले होते असे म्हणत फडणवीस यांनी ठाकरे बंधुंबाबत बोलण्याचे टाळले. आजचा विजय आम्ही नम्रपणे स्वीकारत आहोत. मी आमच्या कार्यकर्त्यांनाही सांगत आहे की उन्मादाने कोणीही वागू नका. महापालिकांचा कारभार आम्हाला पारदर्शक करायचा आहे.

या निवडणुकीत आपण आणि ठाकरेबंधु यांनी एकमेकांवर टोकाची टीका केली याकडे लक्ष वेधले असता ते म्हणाले की, निकालाने ते सगळे संपावे अशी माझी भावना आहे. मला बदलाचे राजकारण करायचे आहे, बदल्याचे नाही हे मी आधीही सांगितलेले आहे. जनतेने कोणाला का स्वीकारले आणि कोणाला का नाकारले याचे आत्मपरीक्षण विरोधकांनी करावे एवढीच माझी अपेक्षा आहे आपल्या कार्याचा, विचारांचा आत्मा हा हिंदुत्ववादच आहे. या हिंदुत्ववादाच्या आत्म्यानेच आपल्याला सगळीकडे पोहोचविले. आमचे हिंदुत्व व्यापक आहे. आमचा पुढचा अजेंडाही विकासच असणार आहे. शहरांना परिवर्तित करून सामान्यांच्या, गोरगरिबांच्या जीवनात परिवर्तन आणू.

आभार मुंबईकर, आभार महाराष्ट्र.... विकास, विकास आणि फक्त विकासाचा शब्द मी सर्वच महानगरांमधील आबालवृद्धांना आज देत आहे. त्यासाठी, 'सब का साथ, सब का विकास' हे पंतप्रधान मोदीजींचे ध्येय प्रत्यक्षात आणण्यासाठी आम्ही जीवाचे रान करू, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका निवडणुकीतील देदीप्यमान यशानंतर खास लोकमतशी बोलताना सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : No Marathi-Non-Marathi Politics, Focus on Development: Fadnavis

Web Summary : Chief Minister Fadnavis pledged development for all, ending divisive politics. He promised housing, jobs for Marathi people in Mumbai, and transparent governance across corporations. Focusing on development, inspired by PM Modi's vision, he seeks to transform cities and improve lives for all citizens.
टॅग्स :महाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६मुंबई महापालिका निवडणूक निकाल २०२६देवेंद्र फडणवीसभाजपा