Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईसह राज्यातील महापालिका निवडणुकांत भाजपने काय कमावले? ठाकरे सेनेने हिशेबच मांडला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2026 09:47 IST

BMC Election result 2026: शिवसेना UBT चे नगरसेवक ६५ वर पोहोचल्याचा दावा करत सुषमा अंधारे यांनी भाजपच्या 'शंभर पार'च्या स्वप्नावर खोचक भाष्य केले.

मुंबई: महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल हाती आल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शिवसेना (UBT) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गटावर शाहसेना म्हणत जोरदार निशाणा साधला आहे. "स्वायत्त यंत्रणा अधीन ठेवून आणि कोट्यावधींचा पाऊस पाडूनही भाजपला मुंबईत साधे शतकही गाठता आले नाही," अशा शब्दांत त्यांनी भाजपच्या कामगिरीवर टीका केली आहे.

नगरसेवकांच्या आकडेवारीवरून हल्लाबोल सुषमा अंधारे यांनी विविध पक्षांच्या नगरसेवकांच्या वाढलेल्या आणि घटलेल्या संख्येचा पाढाच वाचला. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की:

शिवसेना (UBT): पूर्वी २०-२५ असलेले नगरसेवक आज ६५ वर पोहोचले आहेत.

मनसे: मनसेचे ६ नगरसेवक निवडून येणे हा एक वेगळाच फायदा आहे.

शिंदे गट (शाहसेना): ५३ नगरसेवकांवरून हा आकडा आता २८ वर घसरला आहे.

भाजप: ८४ नगरसेवकांमध्ये केवळ ४ ची वाढ होऊन ते ८८ वर पोहोचले आहेत.

'स्वबळा'च्या दाव्याची पोलखोल "२७ महापालिका जिंकू म्हणणारी भाजप प्रत्यक्षात फक्त ९ ठिकाणी स्वबळावर आहे, तर १५ ठिकाणी त्यांना कुबड्यांची (युतीची) गरज भासत आहे," असा टोलाही त्यांनी लगावला. आपल्या खास शैलीत भक्तगणांना उद्देशून त्यांनी "बेडूक कितीही फुगला तरी त्याचा बैल होत नाही" असे म्हणत भाजपच्या वाढीव दाव्यांची खिल्ली उडवली आहे.

मुंबई महापालिकेत शिवसेना (UBT) ची ताकद वाढल्याचा दावा करत अंधारे यांनी आगामी काळात मुंबईवर ठाकरेंचाच भगवा फडकणार असा विश्वास व्यक्त केला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : BJP's gains in Maharashtra's municipal elections questioned by Thackeray's Sena.

Web Summary : Shiv Sena (UBT) criticizes BJP's performance in municipal elections, highlighting modest gains despite resources. They pointed out the decline of the Shinde faction and questioned BJP's self-reliance claims, predicting UBT's dominance in Mumbai.
टॅग्स :मुंबई महापालिका निवडणूक निकाल २०२६महाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६सुषमा अंधारेशिवसेनाभाजपा