BMC Election Result 2026 : दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ! दोन बड्या मुस्लिम नेत्यांच्या वादात AIMIMची चांदी; मुंबईत ओवैसींचा 'चौकार'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 17:01 IST2026-01-16T17:00:12+5:302026-01-16T17:01:17+5:30

दोन बड्या नेत्यांच्या भांडणाचा फायदा घेत असदुद्दीन ओवैसी यांच्या पक्षाने मुंबईत ४ जागांवर विजय मिळवून आपला पतंग मोठ्या दिमाखात उडवला आहे.

BMC Election Result 2026: The third party benefits from the fight between the two! AIMIM's silver in the dispute between two big Muslim leaders; Owaisi's 'foursome' in Mumbai | BMC Election Result 2026 : दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ! दोन बड्या मुस्लिम नेत्यांच्या वादात AIMIMची चांदी; मुंबईत ओवैसींचा 'चौकार'

BMC Election Result 2026 : दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ! दोन बड्या मुस्लिम नेत्यांच्या वादात AIMIMची चांदी; मुंबईत ओवैसींचा 'चौकार'

मुंबई महापालिका निवडणुकीच्या निकालांनी यंदा राज्याच्या राजकीय समीकरणांना मोठी कलाटणी दिली आहे. विशेषतः मानखुर्द-शिवाजी नगर आणि चेंबूर परिसरात समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते नवाब मलिक यांच्यातील तीव्र राजकीय संघर्ष 'एमआयएम'च्या पथ्यावर पडला आहे. या दोन बड्या नेत्यांच्या भांडणाचा फायदा घेत असदुद्दीन ओवैसी यांच्या पक्षाने मुंबईत ४ जागांवर विजय मिळवून आपला पतंग मोठ्या दिमाखात उडवला आहे.

कुठे कुठे मिळाला विजय? 

एमआयएमने या निवडणुकीत अत्यंत नियोजित पद्धतीने प्रचार केला होता. त्याचे फळ त्यांना ४ प्रभागांमध्ये मिळाले आहे. 

प्रभाग १३६ (मानखुर्द-शिवाजी नगर): येथे जमीर कुरेशी यांनी १४,९२१ मते मिळवत आपल्या प्रतिस्पर्ध्याचा तब्बल ९,९२३ मतांच्या फरकाने पराभव केला. या मोठ्या विजयाने एमआयएमच्या ताकदीची चुणूक दाखवून दिली आहे.

प्रभाग १३७: या प्रभागातून एमआयएमचे समीर रमजान पटेल ९,४३६ मते मिळवून विजयी झाले. त्यांनी ४,५६८ मतांच्या फरकाने विजय मिळवला.

प्रभाग १४५ (चीता कॅम्प, चेंबूर): येथे एमआयएमच्या महिला उमेदवार खैरनुसा अकबर हुसेन यांनी बाजी मारली आहे.

प्रभाग १३४: या प्रभागातून मेहजबीन अतीक अहमद या विजयी झाल्या असून त्यांनी एमआयएमचा चौथा विजय सुकर केला.

आझमी-मलिक वादाचा इम्पॅक्ट

राजकीय विश्लेषकांच्या मते, मानखुर्द आणि आसपासच्या परिसरात अबू आझमी आणि नवाब मलिक यांच्यात गेल्या काही वर्षांपासून वर्चस्वाची लढाई सुरू आहे. या निवडणुकीत दोघांनीही एकमेकांविरुद्ध तगडी फिल्डिंग लावली होती. मात्र, या दोन दिग्गज नेत्यांच्या वादात मुस्लिम मतदारांचा एक मोठा वर्ग विखुरला गेला. मतदारांच्या या विभाजनाचा थेट फायदा एमआयएमला झाला. ओवैसींच्या पक्षाने स्थानिक पातळीवर मजबूत बांधणी करून 'तिसरा पर्याय' म्हणून स्वतःला सिद्ध केले.

ओवैसींच्या गोटात जल्लोष 

मुंबई महापालिकेत ४ जागा जिंकणे हा एमआयएमसाठी मोठा राजकीय संदेश मानला जात आहे. "आम्ही केवळ निवडणुका लढवत नाही, तर लोकांच्या मनातील पर्याय आहोत," असे एमआयएमच्या स्थानिक नेत्यांनी निकालांनंतर म्हटले आहे. या निकालांमुळे मानखुर्द आणि चेंबूरमधील समाजवादी पक्ष आणि राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यांना मोठे खिंडार पडले आहे.

Web Title: BMC Election Result 2026: The third party benefits from the fight between the two! AIMIM's silver in the dispute between two big Muslim leaders; Owaisi's 'foursome' in Mumbai