Join us
Daily Top 2Weekly Top 5

 राज ठाकरे म्हणाले, "…तेव्हा मला तुरुंगातून सुटून आलो असं वाटलं’’

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2026 15:49 IST

Mumbai Municipal Corporation Election: ठाकरे बंधूंच्या युतीचा वचननामा प्रसिद्ध करण्याच्या निमित्ताने तब्बल २० वर्षांनंतर राज ठाकरे हे उद्धवसेनेचे मुख्यालय असलेल्या सेना भवन येथे आले. शिवसेनेचं राजकारण आणि मराठी अस्मितेचं केंद्र असलेल्या सेना भवन येथे अनेक वर्षांनी आल्यानंतर राज ठाकरे हे काहीसे भावनिक झाले.

मराठी माणसाचं हित आणि मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर आपापसातील जुने वाद मिटवत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे बंधू एकत्र आले होते. त्यानंतर मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंच्या उद्धवसेना आणि मनसे या पक्षांनी युती करत एकत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी आज मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी संयुक्त वचननामा प्रसिद्ध केला. या निमित्ताने तब्बल २० वर्षांनंतर राज ठाकरे हे उद्धवसेनेचे मुख्यालय असलेल्या सेना भवन येथे आले. शिवसेनेचं राजकारण आणि मराठी अस्मितेचं केंद्र असलेल्या सेना भवन येथे अनेक वर्षांनी आल्यानंतर राज ठाकरे हे काहीसे भावनिक झाले. तसेच मला तुरुंगातून सुटून आलो आहे, असं वाटल्याची मिश्किल प्रतिक्रियाही राज ठाकरे यांनी दिली.

तब्बल २० वर्षांनंतर सेना भवनात आलेले राज ठाकरे म्हणाले की, माझे मित्र संजय राऊत यांनी वारंवार उल्लेख केला की, २० वर्षांनंतर राज ठाकरे आले. मला खरंतर २० वर्षांनंतर सुटून आल्यासारखं वाटतंय. २० वर्षे तुरुंगात होतो, आज पहिल्यांदाच सुटून आले आहेत, आपण त्यांचं स्वागत करुया, असं मला वाटलं. आज मी खूप वर्षांनंतर शिवसेना भवनमध्ये आलो. नवीन शिवसेना भवन मी पहिल्यांदाच पाहतोय. माझ्या मनामध्ये कायमच्या कोरल्या गेलेल्या ज्या आठवणी आहेत, त्या जुन्या शिवसेना भवनामधील आहेत. त्यामुळे कुठे काय होतं, हे आता मला आठवत नाही आहे, असे त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, जुन्या शिवसेना भवनामधील अनेक आठवणी मी सांगू शकतो. १९७७ साली शिवसेना भवन बांधलं गेलं होतं. त्यावेळीच जनता पार्टीचं सरकार आलं होतं. त्यावेळी झालेल्या सभेनंतर शिवसेना भवनावर दगडफेक झाली होती. तेव्हापासूनच्या आठवणी माझ्या मनात आहेत. मात्र आज त्या आठवणीत मी रमत नाही.  

दरम्यान, मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये युती करून लढत असलेल्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी आपल्या पक्षांचा संयुक्त वचननामा प्रसिद्ध केला. या वचननाम्यामधून ठाकरे बंधूंनी मुंबईकरांसाठी आवास, सार्वजनिक आरोग्य, रोजगार, शिक्षण, परिवहन अशा विविध बाबींशी संबंधित महत्त्वपूर्ण आश्वासनं दिली आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Raj Thackeray: 'Felt like I was released from prison'

Web Summary : After 20 years, Raj Thackeray visited Sena Bhavan, expressing a sense of release. He reminisced about past events as the Thackeray brothers announced a joint manifesto for Mumbai's municipal elections, focusing on housing, health, employment, education, and transport.
टॅग्स :महानगरपालिका निवडणूक २०२६मुंबई महापालिका निवडणूक २०२६राज ठाकरेशिवसेनामनसेमुंबई महानगरपालिका