शपथपत्रात चुकीची माहिती, तर अर्ज बाद, महापालिकेच्या स्पष्ट सूचना
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2025 10:51 IST2025-12-23T10:51:04+5:302025-12-23T10:51:19+5:30
खर्चाचा हिशेब सादर करणे आवश्यक : उमेदवारी अर्ज भरण्यास आजपासून सुरुवात

शपथपत्रात चुकीची माहिती, तर अर्ज बाद, महापालिकेच्या स्पष्ट सूचना
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : आगामी महानगरपालिका निवडणुकीत उमेदवारांकडून शपथपत्रातील कोणताही रकाना कोरा ठेवल्यास किंवा चुकीची माहिती आढळल्यास उमेदवारी अर्ज रद्द होऊ शकतो, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे ते व्यवस्थित भरले जातील याची काळजी उमेदवारांनी घ्यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
निवडणुकीच्या अनुषंगाने सोमवारी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत पालिका अधिकाऱ्यांची मुख्यालयात बैठक झाली. यावेळी मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी निवडणुकीच्या विविध प्रशासकीय, तांत्रिक आणि कायदेशीर बाबींची सविस्तर माहिती दिली. मंगळवारपासून इच्छुक उमेदवारांकडून नामनिर्देशन पत्र भरण्याची प्रक्रिया सुरू होत आहे.
आचारसंहितेचे पालन करा : आयुक्त
मुंबई महानगरपालिकेची निवडणूक प्रक्रिया निर्भय, मुक्त, पारदर्शक, तसेच शिस्तबद्ध वातावरणात होण्यासाठी पालिका प्रशासन व निवडणूक यंत्रणा
प्रयत्न करत आहे. संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत राजकीय पक्षांची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.
निवडणूक प्रक्रिया निष्पक्ष,
पारदर्शक व विश्वासार्ह राहावी यासाठी सर्व राजकीय पक्षांनी राज्य निवडणूक आयोगाने निर्धारित केलेल्या आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे, पालिका
आयुक्तांनी केले आहे.
दिलेल्या नमुन्यातच
माहिती भरण्याच्या सूचना
निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्रे (उमेदवारी अर्ज) दाखल करताना उमेदवारांनी चूक करू नये. दिलेल्या नमुन्यातच माहिती भरावी. सोबत तांत्रिक अडचणींमुळे कोणाचाही अर्ज बाद होणार नाही, याची काळजी उमेदवारांनी घ्यावी, अशा सूचना अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांनी केल्या.
मतदानाची टक्केवारी वाढविण्याचे उद्दिष्ट
लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदानाची टक्केवारी वाढवणे हे प्रशासनाचे मुख्य उद्दिष्ट आहे. पालिकेकडून ‘स्वीप’अंतर्गत जनजागृती करण्यात येत असून, राजकीय पक्षांनीही त्याला हातभार लावावा.
उमेदवारांनी प्रचारादरम्यान होणाऱ्या प्रत्येक खर्चाची नोंद ठेवणे आणि विहित मुदतीत निवडणूक खर्चाचा हिशोब सादर करणे आवश्यक असल्याचे करनिर्धारण व संकलन विभागाचे सहआयुक्त विश्वास शंकरवार यांनी स्पष्ट केले.