फक्त २,३०० मते, तरी नगरसेवकपदाची माळ पडलेली गळ्यात, २०१७ ला मुंबईत काय झालेले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2025 10:35 IST2025-12-22T10:35:17+5:302025-12-22T10:35:33+5:30
पाच हजारांपेक्षा कमी मते मिळालेले १७ जण. १५ उमेदवार तीन ते पाच हजार मिळवून विजयी झाले होते. त्यात शिंदेसेनेचे उपनेते यशवंत जाधव यांचाही समावेश...

फक्त २,३०० मते, तरी नगरसेवकपदाची माळ पडलेली गळ्यात, २०१७ ला मुंबईत काय झालेले...
- सुजित महामुलकर
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : महापालिका निवडणुकीत प्रत्येक मत किती महत्त्वाचे असते, याचा प्रत्यय २०१७ च्या निवडणुकीत १७ विजयी उमेदवारांना आला आहे. या १७ पैकी १५ उमेदवारांना पाच हजारांपेक्षाही कमी मते मिळाली, तर तीन हजारांपेक्षा कमी मते मिळूनही दोघे नगरसेवक म्हणून निवडून आले. विशेष म्हणजे, या १७ जणांमध्ये ११ महिला आहेत.
गेल्या निवडणुकीत वॉर्ड क्रमांक १७४ (अँटॉप हिल) मध्ये भाजपच्या कृष्णावेणी रेड्डी यांना केवळ २,३०० मते मिळाली. तरीही त्या विजयी झाल्या. मतांप्रमाणे त्यांचे मताधिक्यही ३७ इतके कमी होते. तर, प्रभाग १३५ (मानखुर्द) मधील एकसंघ शिवसेनेच्या समीक्षा सक्रे यांना २,८०४ मते मिळूनही त्या नगरसेविका म्हणून निवडून आल्या. त्यांचा कार्यकाल २०२२ मध्ये संपुष्टात आला.
उर्वरित १५ उमेदवार तीन ते पाच हजार मिळवून विजयी झाले होते. त्यात शिंदेसेनेचे उपनेते यशवंत जाधव यांचाही समावेश असून, त्यांना प्रभाग २०९ (माझगाव) मध्ये ४,८८४ मते मिळाली होती. तर, गेल्या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार विठ्ठल लोकरे यांना ३,६४२ मते मिळाली होती.
सध्या ते उद्धवसेनेत आहेत. ज्येष्ठ माजी नगरसेवक, माजी विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी काँग्रेसकडून निवडणूक लढवत ३,८१४ मते घेत विजय मिळवला होता. आता रवी राजा भाजपमध्ये आहेत.
दरम्यान, येत्या निवडणुकीत महायुती, दोन्ही ठाकरे बंधू आणि काँग्रेस स्वतंत्रपणे लढल्यास विजयी उमेदवारांचे मताधिक्य कमीच असेल.
घोसाळकर यांना ४९१३ मते
उद्धवसेनेचे उपनेते, माजी आ. विनोद घोसाळकर यांच्या स्नुषा तेजस्वी यांनाही दहिसरच्या प्रभाग क्रमांक १ मधून निवडणूक लढवत ४,९१३ मते मिळवली होती. त्यांनी नुकताच उद्धवसेनेतून भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
मनसेचे दत्ता नरवणकर यांना वरळीच्या प्रभाग १९७ मधून मनसेचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवली. त्यात त्यांना ४,४१९ मते मिळाली आणि नगरसेवक झाले होते. सध्या नरवणकर शिंदेसेनेत आहेत.
सर्वाधिक मते मिळालेले माजी नगरसेवक
प्रभाग उमेदवार पक्ष मते
क्र.
१५ प्रवीण शाह भाजप २२,८०७
३० लीना पटेल भाजप १८,३३३
४६ योगिता कोळी भाजप १६,८६८