मुंबईकरांसाठी महायुतीचा 'वचननामा' जाहीर; ५ वर्षांसाठी पाणीपट्टी स्थगीत, महिलांसाठी BESTचे अर्धे तिकीट अन् बरंच काही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2026 13:52 IST2026-01-11T13:52:11+5:302026-01-11T13:52:51+5:30

महायुतीच्या या वचननाम्यात पाच वर्षांसाठी पाणीपट्टी वाढ स्थगित करणे, बेस्टमध्ये महिलांना ५० टक्के सवलत देणे, लाडक्या बहिणींना लघु उद्योगासाठी ५ लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज, झोपडपट्टीमुक्त मुंबई, ३० ते ३५ लाख घरांची निर्मिती करणे, रोहिंग्या आणि बांगलादेशी मुक्त मुंबई करणे, तसेच, धारावीचा विकास आदी अनेक घोषणा करण्यात आल्या आहेत.   

bmc election bjp shiv sena mahayuti manifesto Mahayuti promise for Mumbaikars announced Water bill suspended for 5 years, half price BEST tickets for women and much more devendra fadnavis eknath shinde | मुंबईकरांसाठी महायुतीचा 'वचननामा' जाहीर; ५ वर्षांसाठी पाणीपट्टी स्थगीत, महिलांसाठी BESTचे अर्धे तिकीट अन् बरंच काही!

फोटो: सुशिल कदम

मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज महायुतीने आपला वचननामा (जाहीरनामा) प्रसिद्ध केला. खरे तर, शिवसेना-मनसे युतीचा जाहीरनामा प्रसिद्ध झाल्यानंतर,  महायुतीचा जाहीरनामा केव्हा येणार याची सर्वांनाच उत्सुकता होती. आज अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मुंबईसाठीचा आपला वचननामा (जाहीरनामा) प्रसिद्ध केला. महायुतीच्या या वचननाम्यात पाच वर्षांसाठी पाणीपट्टी वाढ स्थगित करणे, बेस्टमध्ये महिलांना ५० टक्के सवलत देणे, लाडक्या बहिणींना लघु उद्योगासाठी ५ लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज, झोपडपट्टीमुक्त मुंबई, ३० ते ३५ लाख घरांची निर्मिती करणे, रोहिंग्या आणि बांगलादेशी मुक्त मुंबई करणे, तसेच, धारावीचा विकास आदी अनेक घोषणा करण्यात आल्या आहेत.   

यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, "१५ तारखेला मुंबई महापालिका निवडणुक पार पडत आहे. आजचा हा वचननामा मुंबईकरांच्या दररोजच्या जीवनात बदल घडवणारा ठरेल, असा विश्वास व्यक्त करतो. मुंबई हा या देशाचा प्राण आहे. ग्रोथ इंजिन आहे. या मुंबईला पुढच्या पाच वर्षांत जागतिक दर्जाचे शहर करम्याचे वचन आम्ही देत आहोत. केंद्रात आणि राज्यात महायुतीचेच सरकार आहे. आता १६ तारखेला महायुतीचा भगवा महापालिकेवर फडकेल. मुंबईच्या विकासासाठी जे करायचं आहे ते आम्ही या वचननाम्यात सांगितले आहे. अडीच वर्ष मी मुख्यमंत्री होतो. त्यानंतर देवेंद्र फडणवीसांचे एक वर्ष, आम्ही मुंबईत जे काम केले, ते आपल्यासमोर आहेच. मुंबईच्या विकासाचा वेग आणखी वाढवायचा आहे. ते आम्ही यात दिलेच आहे. मुंबईत आलेल्या मराठी माणसाचे रक्षण करणे, संस्कृती जतन करणे आमची जबाबदारी आहे. वचन आहे. महत्वाचे म्हणजे, मुंबईबाहेर गेलेला मुंबईकर आम्हला पुन्हा एकदा मुंबईत आणायचा आहे. मुंबईकर इकडे वसई, विरार, नालासोपाऱ्यापर्यंत गेलाय, तर दुसरीकडे अंबरनाथ बदलापूर वांगणीपर्यंत गेला, याला जबाबदार कोण? असा प्रश्न करत, याचा विचार व्हायला हवा, असेही शिंदे यावेळी म्हणाले.

मोठ्या प्रमाणावर लोकांना घरे मिळतील, मुंबई बाहेर गेलेला माणून पुन्हा मुंबईत येईल -
शिंदे पुढे म्हणाले, झोपडपट्टीमुक्त मुंबई हे शिवसेनाप्रमुखांचे लक्ष होते. आता आम्ही या संपूर्ण प्रकल्प मार्गी लावायचा निर्णय घेतला आहे. हक्काची घरं मुंबईकरांना मिळायला हवीत, यासंदर्भातही वचन आम्ही दिले आहे. सर्वांसाठी घरे ही संकल्पना पुढे नेण्यासाठी ३० ते ३५ लाख घरांची निर्मिती करण्याचा आमचा मानस आहे. मोठ्या प्रमाणावर लोकांना घरे मिळतील आणि मुंबई बाहेर गेलेला माणून पुन्हा मुंबईत येईल. पंतप्रधान, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, आणि माझ्यावर सातत्याने टीका करत आहेत की, मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार परंतु असं कदापी होणार नाही. पंतप्रधान मोदींनी मुंबईला फार महत्व दिले आहे. मुंबई फिनटेक सिटी करण्याचा पंतप्रधानांचा निर्धार आहे. यामुळे येणाऱ्या ५ वर्षांत मुंबईला फिनटेक सिटी करायला हवे, अशी आमची भावना आहे. त्यासाठी केंद्र-राज्य सरकार आणि मनपा मुळून हे करेल.

लाडक्या बहिणीसाठी बेस्ट भाडे अर्धे करणार -
लाखो तरुणांसाठी रोजगार निर्मिती होईल. बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दी वर्ष देखील आम्ही महापालिकेचेच्या माध्यमातून विविध सामाजिक लोकाभीमुखू उपक्रम राबवणार आहोत. बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय विद्यापीठ करण्याचाही आमचा मानस आहे. मुंबईकर लाडक्या बहिणीसाठी बेस्टमध्ये ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय आम्ही केला आहे. लघू उद्योजकांना ५ लाख रुपये बिनव्याजी कर्ज देणे, पुनर्विकासाठी कोणतेही अडथळे येणार नाहीत, याची व्यवस्था आम्ही केली आहे. याशिवाय पाच वर्षासाठी पाणीपट्टी वाढीला स्थगिती देऊ, वचननाम्यातील अशा अनेक गोष्टी एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितल्या.  

महायुतीच्या वचननाम्यातील काही महत्त्वाचे मुद्दे - 
पाच वर्षासाठी पाणीपट्टी वाढीला स्थगिती देणार.
- मुंबईला पाणीपुरवठा वाढवण्यासाठी पुढील ५ वर्षात गारगाई, पिंजाळ, दमणगंगा प्रकल्प पूर्ण करणार 
- लघु उद्योग धोरण राबवले जाणार 
- पुनर्विकासाला जलदगती देणार, पागडीमुक्त मुंबई आणि फनेल झोनप्रश्नी जाहीर केलेली योजना जलदगतीने राबविणार 
- बेस्टमध्ये २०२९ पर्यंत पूर्णपणे इलेक्ट्रिक बसेस 
- बेस्टमध्ये महिलांना ५० टक्के सवलत 
- बेस्ट बसेसची संख्या ५ हजारवरुन १० हजारांवर जाणार 
- लाडक्या बहिणींना आत्मनिर्भर करण्यासाठी व लघु उद्योग स्थापन करण्यासाठी ५ लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज 
- रोहिंग्या व बांगलादेशी मुक्त मुंबई करणार 
- पर्यावरण संवर्धन योजनेमार्फत १७ हजार कोटी रुपये 
- पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटन विभागाची स्थापना करणार 
- बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दीनिमित्ताने मराठी तरुणांसाठी विशेष कार्यक्रम आणि आर्थिक तरतूद राबवली जाणार
- बीएमसी मार्केटमध्ये मासळी विक्रेत्यांसाठी कोल्ड स्टोरेज उभारणार 
- सर्व भाजी मंडईचे नुतनीकरण आणि पुर्नविकास करणार 
- फिश इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट सेंटर स्थापन करण्यात येणार
- स्टार्टअप इनक्युबेशन सेंटरची उभारणी करणार 
- पालिकेत स्वतंत्र मराठी भाषा विभागाची स्थापना करणार 
- मराठी कला केंद्र आणि अभ्यासिकेची उभारणी करणार 
- विकसित मुंबईसाठी २०३४ चा आराखडा तयार होणार


 

Web Title : मुंबई महायुति का घोषणापत्र: संपत्ति कर फ्रीज, महिलाओं के लिए BEST छूट।

Web Summary : महायुति के घोषणापत्र में मुंबई संपत्ति कर को पांच साल के लिए फ्रीज करने, महिलाओं के लिए BEST छूट, ब्याज मुक्त ऋण, झुग्गी-मुक्त मुंबई और विकास परियोजनाओं का वादा किया गया है। बुनियादी ढांचे और आवास पर ध्यान केंद्रित किया गया है।

Web Title : Mumbai MahaYuti's manifesto: Property tax freeze, BEST discounts for women.

Web Summary : MahaYuti's manifesto promises Mumbai property tax freeze for five years, BEST discounts for women, interest-free loans, slum-free Mumbai, and development projects. Focus on infrastructure and housing.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.