मुंबई - राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकीसाठी प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. सगळेच राजकीय पक्ष आपापल्या परीने महापालिकेच्या रणांगणात उतरले आहेत. त्यात मुंबई महापालिका निवडणुकीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. मुंबईत महायुतीने प्रचाराचा नारळ फोडला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभाही पार पडली. फडणवीसांनी मुंबई उपनगरातही प्रचार सभा घेतल्या. मात्र अद्याप ठाकरे बंधूंची एकही सभा सुरू झाली नाही. पहिल्यांदाच शिवयुती म्हणून उद्धवसेना-मनसे निवडणुकीत एकत्रित उतरले आहेत. या दोन्ही पक्षांनी त्यांचा वचननामाही प्रकाशित केला आहे. मात्र उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या सभेची उत्सुकता कार्यकर्त्यांना आहे.
मुंबईत सभांऐवजी शाखा भेटींवर ठाकरे बंधू यांनी जोर दिला आहे. उद्धव ठाकरे, राज ठाकरे, आदित्य ठाकरे, अमित ठाकरे यांनी मुंबई शहरासह पूर्व, पश्चिम उपनगरातील शाखाभेटींवर भर दिला आहे. प्रत्येक शाखेला भेट देऊन तिथल्या उमेदवारांना आणि कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्याचं काम ठाकरे बंधू करत आहेत. येत्या १५ जानेवारीला महापालिका निवडणुकांसाठी मतदान पार पडणार आहे. प्रचाराला काहीच दिवस शिल्लक आहेत. त्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची ११ जानेवारीला संयुक्त सभा मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्क म्हणजे शिवतीर्थावर पार पडणार आहे. या सभेतून ठाकरी तोफा विरोधकांवर धडकणार आहेत. त्यामुळे या सभेचे निमंत्रण आजच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून कार्यकर्त्यांना देण्यात येत आहे.
मुंबईत महायुतीविरुद्ध शिवशक्ती युतीचा थेट सामना
मुंबईत एकूण २२७ वार्डात महायुती विरुद्ध उद्धवसेना-मनसे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीची म्हणजे शिवशक्ती युतीचा सामना होणार आहे. जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणून मुंबई महापालिकेवर आमचाच भगवा झेंडा फडकेल असा विश्वास महायुतीकडून व्यक्त होत आहे. मात्र या महायुतीसमोर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे कडवे आव्हान आहे. पहिल्यांदाच हे दोन्ही पक्ष एकत्रित निवडणूक लढवत असल्याने या निवडणुकीत नेमकं मुंबईकर जनता कुणाच्या बाजूने कौल देणार हे पाहणे गरजेचे आहे. महायुती, उद्धवसेना-मनसे-राष्ट्रवादी यासोबत काँग्रेस वंचित आघाडीनेही मुंबईत उमेदवार उतरवले आहेत. त्यामुळे काही भागात तिरंगी आणि चौरंगी लढतही पाहायला मिळणार आहे.