महापालिकेच्या रणसंग्रामात रणरागिणी; उद्धवसेनेतून ९९, भाजपमधून ७६ महिला
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 11:45 IST2026-01-07T11:45:54+5:302026-01-07T11:45:54+5:30
यंदा निवडणुकीत सर्व पक्षीय अनेक महिलांनी खुल्या गटातून अर्ज भरल्याने लढत अधिक रंगतदार होण्याची चिन्हे आहेत.

महापालिकेच्या रणसंग्रामात रणरागिणी; उद्धवसेनेतून ९९, भाजपमधून ७६ महिला
महेश पवार, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : पालिका निवडणुकीत उद्धवसेनेने महिलांना सर्वाधिक संधी देत १६७ पैकी ९९ जणींना रिंगणात उतरविले आहे. त्यातील १६ महिलांनी खुल्या प्रभागातून अर्ज भरत थेट पुरुष उमेदवारांना आव्हान दिले आहे.
भाजपने १३७ पैकी ७६ महिलांना उमेदवारी दिली असून, त्यातील ११ महिला खुल्या प्रवर्गातून लढत आहेत. यंदा निवडणुकीत सर्व पक्षीय अनेक महिलांनी खुल्या गटातून अर्ज भरल्याने लढत अधिक रंगतदार होण्याची चिन्हे आहेत.
२०१७ च्या पालिका निवडणुकीत एकसंध शिवसेनेने १२६ महिलांना उमेदवारी दिली होती. त्यातील ४६ महिला विजयी झाल्या होत्या. शिवसेना पक्षफुटीनंतर मोठ्या संख्येने माजी नगरसेविकांनी शिंदेसेनेत प्रवेश केल्याने उद्धवसेनेची महिला आघाडी कमजोर झाल्याचे मानले जात असताना यावेळी मोठ्या प्रमाणात महिलांना संधी देत या चर्चाना पक्षाने पूर्णविराम दिला. ५ महिलांना राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाने संधी दिली आहे.
२०१७ मध्ये भाजपने ११२ महिलांना संधी दिली होती. त्यापैकी ४४ जणी विजयी झाल्या होत्या. काँग्रेसने २०१७ मध्ये २२४ पैकी ११२ महिलांना उमेदवारी दिली. मात्र, केवळ १६ महिला निवडून आल्या होत्या. यंदा काँग्रेसने १३९ उमेदवारांपैकी ६६ महिलांना संधी दिली आहे. तर, शिंदेसेनेने ९१ उमेदवारांपैकी ६२ महिला उमेदवार मैदानात उतरविल्या आहेत.
मनसेच्या २९ मैदानात
१ मनसेने २०१७ मध्ये १०४ जागांवर निवडणूक लढवत २७महिलांना उमेदवारी दिली होती. मात्र, तीन महिलांसह पक्षाचे केवळ सात उमेदवार निवडून आले होते. यावेळी मनसेने ५३ उमेदवार दिले असून त्यात २९ महिलांचा समावेश आहे.
इतर पक्षांमध्ये समाजवादी पक्षाने ४६, राष्ट्रवादीने (अजित पवार) २४ पैकी ५२, राष्ट्रवादीने (शरद पवार) ११ पैकी ५, तर वंचित बहुजन आघाडीने ४६ पैकी २२ महिलांना उमेदवारी दिली.
१३२ नगरसेविका सभागृहात
२०१७ च्या महापालिका निवडणुकीत एकूण १,०७४ महिलांनी निवडणूक लढविली होती. त्यातील १३२ महिला विजयी झाल्या. यंदा ८७९ महिला निवडणूक लढवीत आहेत.