BMC Election 2026: मुंबईत पुन्हा महिलांचे वर्चस्व; २२७ पैकी १३० जागांवर महिलांचा विजय
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2026 05:52 IST2026-01-19T05:52:29+5:302026-01-19T05:52:48+5:30
या आधी सात महिलांनी भूषवले महापौरपद

BMC Election 2026: मुंबईत पुन्हा महिलांचे वर्चस्व; २२७ पैकी १३० जागांवर महिलांचा विजय
मुंबई: मुंबई महापालिकेच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत या आठवड्यात निघण्याची शक्यता आहे. निवडणुकीनंतर आता महापौर कोण होणार, याची चर्चा सुरू झाली आहे. दुसरीकडे मुंबईकरांनी तब्बल १३० महिला नगरसेविका निवडल्या आहेत. पुरुष नगरसेवकांची संख्या केवळ ९७एवढी आहे. त्यामुळे पालिकेत महिला आरक्षण निश्चित होऊन महिलेची महापौर म्हणून निवड झाल्यास पालिकेच्या चाव्या महिलांच्या हाती येतील.
सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईची जबाबदारी आतापर्यंत ७ महिला महापौरांनी सांभाळली आहे. यात काँग्रेसच्या २, तर शिवसेनेच्या ५ महिला महापौरांचा समावेश आहे. या आधीच्या महिला महापौरांनी अभ्यासू प्रतिमा जपत ठसा उमटविला आहे.
मतेही मिळाली सर्वाधिक महिलांसाठी
नियमित ११४ जागा राखीव असताना १३० जागांवर महिला निवडून आल्या आहेत. त्यामुळे महापौरपदाचे आरक्षण महिला गटासाठी निश्चित झाल्यास महिलांना विकासकामे करण्यासाठी अधिक बळ मिळेल, अशी आशा आहे.
२०१७ मध्ये महापालिकेत १३३ महिला निवडून आल्या होत्या यंदा ही संख्या ३ ने कमी झाली असली तरी सर्वाधिक मते मिळवणाऱ्यांमध्येही यंदा महिलांची संख्या लक्षणीय आहे.
मुंबई पालिकेतील नगरसेविकांची संख्या
२०२६
१३० महिला नगरसेवक ९७ पुरुष नगरसेवक
२०१७
१३३ महिला नगरसेवक ९४ पुरुष नगरसेवक
२०१२
१२१ महिला नगरसेवक १०६ पुरुष नगरसेवक
२००२
८९ महिला नगरसेवक १३८ पुरुष नगरसेवक