मंगळवारही प्रतिज्ञापत्राविना, महापालिकेचा आजचा वादा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 09:37 IST2026-01-07T09:37:13+5:302026-01-07T09:37:13+5:30
मुंबई महापालिकेच्या उमेदवारांची माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही.

मंगळवारही प्रतिज्ञापत्राविना, महापालिकेचा आजचा वादा
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : निवडणुकीला आठवडा शिल्लक असताना उमेदवारांची प्रतिज्ञापत्रे मुंबई पालिकेकडून अजूनही अपलोड करण्यात आलेली नाहीत. परिणामी, मंगळवारीही प्रतिज्ञापत्रे उपलब्ध झाली नाहीत. महापालिकेकडे पाठपुरावा केल्यानंतर प्रक्रिया सुरू असून बुधवारी प्रतिज्ञापत्रे अपलोड होतील, असा दावा प्रशासनाने केला. नवी मुंबई, ठाण्यासह इतर महापालिकांनी उमेदवारांची प्रतिज्ञापत्रे अपलोड केली आहेत. त्यामुळे मतदारांना आपल्या उमेदवारांची संपत्ती, शिक्षण, गुन्हे दाखल आहेत का, याची माहिती मिळत आहेत. मुंबई महापालिकेच्या उमेदवारांची माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही.
राज्य निवडणूक आयोगाने सर्व महापालिकांना मतदान केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिद्ध करण्यासाठी ३ जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली होती. मात्र मुंबईतील याद्या अद्याप प्रसिद्ध न झाल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. शिवाय उमेदवारांची प्रतिज्ञापत्रे ही अपलोड झालेली नाहीत. या हलगर्जीपणाला नेमके कोण जबाबदार आहे, निवडणूक यंत्रणा व प्रशासनाने कायदेशीर कालमर्यादा का पाळल्या नाहीत, असा सवाल अनिल गलगली यांनी उपस्थित केला आहे. तसेच प्रतिज्ञापत्र नसल्यामुळे आपला उमेदवार किती शिक्षित आहे? त्याचा व्यवसाय आणि त्याची पार्श्वभूमी काय? या माहितीपासून मतदार वंचित राहत आहे, असे माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी सांगितले.
प्रभागनिहाय मतदार याद्याही मिळणार
महापालिकेकडून २२७ प्रभागनिहाय मतदार यादी ही विक्रीसाठी उपलब्ध करण्यात येणार आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून मतदार यादी प्राप्त होण्यास विलंब झाल्याचे कारण पालिकेकडून देण्यात आले आहे.
सोमवारपर्यंत २२७ पैकी केवळ २१३ प्रभागांची यादी प्राप्त झाली होती. तर मंगळवारी आणखी १३ प्रभागांची यादी प्राप्त झाली. त्यामुळे बुधवारपासून राजकीय पक्षांसाठी ही यादी विक्रीसाठी उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे पालिकेने म्हटले आहे.