Join us
Daily Top 2Weekly Top 5

माहीमचा किल्ला कोण जिंकणार? शिंदेसेनेसमोर उद्धवसेनेचे मोठे आव्हान? शिवसेना भवनाच्या अंगणातील लढती रंगतदार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 14:23 IST

माहीमचा किल्ला कोण जिंकणार, याकडे लक्ष लागले आहे.

महेश पवार, लोकमत न्यूज नेटवर्क,  मुंबई : विधानसभा निवडणुकीत वरळी मतदारसंघापाठोपाठ मनसे नेते अमित राज ठाकरे यांच्या उमेदवारीमुळे माहीम मतदारसंघाने राज्याचे लक्ष वेधले होते. आताही महापालिका निवडणुकीत याच मतदारसंघाची पुन्हा जोरदार चर्चा सुरू आहे. उद्धवसेना-मनसे युतीमुळे या मतदारसंघात अनेक राजकीय घडामोडी घडल्या आहेत. येथील पाचपैकी चार प्रभागांत उद्धवसेना प्रत्येकी दोन प्रभागांत शिंदेसेना व भाजपविरोधात लढत देत आहे. तर, एका प्रभागात मनसे विरुद्ध शिंदेसेना असा सामना होणार आहे. परिणामी माहीमचा किल्ला कोण जिंकणार, याकडे लक्ष लागले आहे.

माहीम विधानसभा मतदारसंघात शिवसेना भवन, शिवाजी पार्क, चैत्यभूमी, संयुक्त महाराष्ट्राचे दालन, स्वा. सावरकर स्मारक, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारक अशी महत्त्वाची ठिकाणे आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे शिवतीर्थ निवासस्थान याच मतदारसंघात आहे. त्यामुळे राजकीयदृष्ट्या हा संवेदनशील मतदारसंघ आहे.

२०१७च्या पालिका निवडणुकीत प्रभाग क्र. १९४मधून बंडखोर उमेदवार महेश सावंत यांचा समाधान सरवणकर यांनी पराभव केला होता. मात्र, सावंत यांनी विधानसभा निवडणुकीत शिंदेसेनेत गेलेल्या आ. सदा सरवणकर आणि अमित ठाकरे यांचाही पराभव केला.

पक्षात आलेल्यांना संधी; इच्छुक उमेदवार नाराज

विधानसभा निवडणुकीनंतर आता बराच बदल झाला आहे. उद्धवसेना, मनसे युतीमुळे माहीमच्या पाचही प्रभागांत दोन्ही पक्षांना पूरक वातावरण आहे. माजी महापौर विशाखा राऊत यांच्या १९१ प्रभागातून सरवणकर यांनी सर्वाधिक ११ हजार ८३४ मते घेतल्याने हा प्रभाग दोन्ही सेनेला नको होता.

युतीमुळे दोन्ही सेनेची मते १६ हजारांहून अधिक झाल्याने येथे राऊत यांच्याविरोधात शिंदेसेनेच्या प्रिया गुरव-सरवणकर यांच्यात काटे की टक्कर होणार आहे. माहीमच्या दोन प्रभागांत माजी आ. सरवणकर यांचा मुलगा, मुलीला उमेदवारी देण्यात आली.

उद्धवसेनेतून शिंदेसेनेत गेलेल्या माजी नगरसेविका प्रीती पाटणकर यांनाही लगेच उमेदवारी दिल्याने शिंदेसेनेचे अन्य इच्छुकनाराज झाले आहेत. एकीकडे पक्षांतर्गत नाराजी, तर दुसरीकडे उद्धवसेना व मनसेच्या तगड्या उमेदवारांच्या आव्हानाचा सामना शिंदेसेना कसा करणार, याची उत्सुकता आहे.

प्रभाग १९४, १९२ मध्ये चुरशीची लढत

प्रभाग १९४मधून मनसेचे माजी नगरसेवक संतोष धुरी व उद्धवसेनेचे आ. सुनील शिंदे यांचे बंधू निशिकांत शिंदे यांनी दावा केला होता. उद्धवसेनेकडे प्रभाग गेल्याने धुरी नाराज झाले होते. येथे आता समाधान सरवणकर व निशिकांत शिंदे अशी लढत होत आहे. तर, १९२ प्रभाग मनसेने यशवंत किल्लेदार यांच्यासाठी प्रतिष्ठेचा केल्याने उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका प्रीती पाटणकर यांनी शिंदेसेनेत प्रवेश केला.

पाच प्रभागांमधील प्रमुख उमेदवार

१८२

मिलिंद वैद्य (उद्धवसेना)राजन पारकर (भाजप)

१९०

वैशाली पाटणकर (उद्धवसेना)शीतल गंभीर (भाजप)

१९१

विशाखा राऊत (उद्धवसेना)प्रिया गुरव सरवणकर (शिंदेसेना)

१९२

यशवंत किल्लेदार (मनसे)प्रीती पाटणकर (शिंदेसेना)

१९४

निशिकांत शिंदे (उद्धवसेना)समाधान सरवणकर (शिंदेसेना) 

English
हिंदी सारांश
Web Title : Mahim Fort Battle: Shinde Sena vs. Uddhav Sena, a Key Contest

Web Summary : Mahim constituency witnesses a fierce battle in the upcoming municipal elections. Uddhav Sena-MNS alliance challenges Shinde Sena and BJP in most wards. Key candidates are in the fray, and internal dissent within Shinde Sena adds complexity. All eyes are on who will conquer Mahim.
टॅग्स :महानगरपालिका निवडणूक २०२६मुंबई महापालिका निवडणूक २०२६शिवसेनामनसे