मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा झाल्यानंतर दोघांच्याही पक्षांमध्ये होणाऱ्या जागावाटपाकडे सर्वांच लक्ष लागलं होतं. दरम्यान, आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी उद्धवसेना आणि मनसे यांच्या युतीमधील जागावाटपाचा आकडा समोर आला आहे.
उद्धवसेना आणि मनसे यांच्यात झालेल्या जागावाटपानुसार मुंबई महानगरपालिकेमधील २२७ जागांपैकी १६५ जगांवर उद्धवसेना निवडणूक लढवणार आहे. तर मनसे ५२ जागांवर लढणार आहे. उर्वरित १० जागा ह्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला सोडण्यात आल्या आहेत. दरम्यान, उद्धवसेना आणि मनसे या पक्षांकडून उमेदवारांना एबी फॉर्म देण्यास सुरुवात झाली आहे. उद्धवसेनेने आतापर्यंत १३५ हून अधिक उमेदवारांना एबी फॉर्म दिले आहेत. तर मनसेने आतापर्यंत ३५ हून अधिक जणांना एबी फॉर्म दिल्याचं वृत्त आहे.
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या बंधूंसाठी महत्त्वाच्या असलेल्या मुंबई महानगरपालिकेमध्ये उद्धवसेना आणि मनसे यांच्यात युती झाल्यानंतर या युतीमध्ये शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही सहभागी झाल्यामुळे दोन्ही भावांचं बळ अधिक वाढण्याची शक्यता आहे.
दरम्यान, मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या जागावाटपाची घोषणा होण्यापूर्वी राज ठाकरे यांनी मनसेच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना महत्त्वपूर्ण आवाहन केलं होतं. या निवडणुकीत कुणाला किती जागा मिळाल्या, याची आकडेवारी मांडून नाराज होऊ नका. मराठी माणसाच्या हितासमोर वैयक्तिक स्वार्थ क्षुल्लक आहे. आता मुंबई वाचवायची जबाबजारी आपली आहे. आपल्याला युतीधर्म पाळायचा आहे. ही निवडणूक आपल्या अस्तित्वाच्या लढाईसारखी आहे. कुठल्याही परिस्थितीत आपल्याला मुंबई हातात राखायची आहे, असेही राज ठाकरे यावेळी म्हणाले होते.