'आम्ही फोटो, पीपीटी दाखवत नाही, प्रत्यक्ष काम करतो'; शायना एनसी यांचा उद्धवसेनेला टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 14:12 IST2026-01-06T14:11:31+5:302026-01-06T14:12:06+5:30
मतदारांसाठी हवेचा दर्जा, शिक्षण, आरोग्य आणि मोकळ्या जागा हे महत्त्वाचे मुद्दे असून निर्णायक पावले उचलली जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

'आम्ही फोटो, पीपीटी दाखवत नाही, प्रत्यक्ष काम करतो'; शायना एनसी यांचा उद्धवसेनेला टोला
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: आम्ही केवळ फोटो आणि पीपीटी दाखवत नाही, तर प्रत्यक्ष काम करून दाखवतो, असा टोला शिंदेसेनेच्या राष्ट्रीय प्रवक्त्या शायना एन.सी. यांनी उद्धवसेनेला लगावला. तसेच हरित मुंबई करण्याचे ध्येय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे असून मुंबईत ३०० एकरवर ग्रीन पार्क, कोस्टल रोडमुळे वेळ आणि इंधनाची बचत, मेट्रो प्रकल्प आणि इलेक्ट्रिक बसेसमुळे प्रदूषणात घट होत असल्याचा दावा त्यांनी केला.
देशासह महाराष्ट्रासमोरील गंभीर समस्यांपैकी एक आहे वाढते वायू त्याचा नागरिकांच्या प्रदूषण. आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे. हे लक्षात घेऊन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी प्रदूषण नियंत्रणासाठी ठोस पावले उचलल्याचे शायना यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री कार्यकाळात प्रदूषण नियंत्रणासाठी ठोस धोरणे नव्हती. उलट भूमीगत मेट्रोसारख्या महत्त्वाच्या विकास प्रकल्पांना विरोध केला. याउलट, महायुती सरकारने जनहित आणि विकासाला प्राधान्य देत निर्णय घेतले, असे त्यांनी सांगितले.
प्रथमच मतदान करणाऱ्या सुमारे पावणे दोन लाख मतदारांसाठी हवेचा दर्जा, शिक्षण, आरोग्य आणि मोकळ्या जागा हे महत्त्वाचे मुद्दे असून निर्णायक पावले उचलली जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.