प्रत्येक १४ टेबलवर होणार एका प्रभागाची मतमोजणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 08:07 IST2026-01-13T08:07:49+5:302026-01-13T08:07:49+5:30
२८ टेबल उपलब्ध झाल्यास दुसरा प्रभाग घेणार; निर्णय अधिकाऱ्यांकडे

प्रत्येक १४ टेबलवर होणार एका प्रभागाची मतमोजणी
मुंबई : मुंबईतील प्रत्येक निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयात उपलब्ध जागेनुसार मतमोजणीसाठी टेबलांचे व्यवस्थापन असेल. १४ टेबलांवर एक प्रभाग या प्रमाणे मतमोजणी सुरू करण्यात येईल. निवडणूक निर्णय अधिकारी कार्यलयात २८ टेबल उपलब्ध झाल्यास एका वेळी दोन प्रभागांची मतमोजणी सुरू होईल. उपलब्ध जागा आणि व्यवस्थापन यानुसार मतमोजणीचे नियोजन करण्यात येईल, अशी माहिती मुंबई महापालिका आयुक्त आणि मुख्य निवडणूक अधिकारी भूषण गगराणी यांनी सोमवारी दिली.
यापूर्वी लोकसभा आणि विधानसभेला निवडणुकीच्या मतमोजणीच्या दिवशी काही ठिकाणी गोंधळाचे वातावरण होते. त्यामुळे आता महापालिका निवडणुकीत मतमोजणीसाठी पालिकेचे नियोजन कसे असेल, याची माहिती गगराणी यांनी पूर्व तयारीच्या बैठकीत दिली. एकाच वेळी एका प्रभागाची मत मोजणी होणार असल्याच्या चर्चामुळे मतमोजणीला उशीर होईल, असे म्हटले जात होते. मतमोजणी प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने, भयमुक्त वातावरणात पार पाडण्याची जबाबदारी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांवर आहे. त्यामुळे जागेची उपलब्धता आणि व्यवस्थापनानुसार मतमोजणी कशी करावी, याचा निर्णय सर्वस्वी संबंधित निवडणूक अधिकारी घेतील, असे गगराणी यांनी सांगितले.
२३ अधिकारी नियुक्त
मुंबईतील २२७ प्रभागांसाठी २३ निवडणूक निर्णय अधिका-यांची नियुक्ती केली आहे. प्रत्येक निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या अखत्यारित कमीत कमी १ ते वॉर्ड ३ वॉर्डाच्या प्रभागाचा समावेश आहे. त्यामुळे निवडणूक अधिकारी कार्यलयात प्रभागाच्या क्रमावरीप्रमाणे एकानंतर एक प्रभागातील मत मोजणी होणार आहे. आयुक्तांच्या माहितीप्रमाणे एका निवडणूक कार्यलयात २८ टेबल असल्यास एका वेळी दोन प्रभागांची मतमोजणीही सुरू होऊ शकते.
निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात प्रभागांची संख्या जितकी अधिक तितका अधिक वेळ तेथील इतर प्रभागांच्या निकालाला लागण्याची शक्यता आहे. आर दक्षिण म्हणजे निवडणूक निर्णय अधिकरी कार्यलय ३ व के पश्चिमच्या कार्यलय ७ मध्ये १३ प्रभाग आहेत.