Join us
Daily Top 2Weekly Top 5

सत्ता अबाधित ठेवायला पक्ष, घर फोडत आहेत, आमच्या कामांचे श्रेय तुम्ही का घेता?: उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 06:28 IST

आमच्या कामांचे श्रेय घेण्यापेक्षा त्यांनी जी कामे केली आहेत, म्हणजे मोदींनी कैलास पर्वत बांधला, स्वर्गातून गंगा आणली आहे, याचे श्रेय घ्या, असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : शिवसैनिकांनी एवढी संकटे आली तरी आपली एकजूट कायम ठेवली आहे, मात्र महायुती फक्त सत्ता अबाधित ठेवण्यासाठी पक्ष फोडत आहेत, घर फोडत आहेत, अशी टीका उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. त्यामुळे मुंबई महापालिकेवर भगवा फडवण्यास सज्ज राहण्याचे आवाहन ठाकरे यांनी कार्यकर्ता आणि पदाधिकाऱ्यांना केले. 

उद्धव ठाकरे यांनी उत्तर मुंबईतील विविध प्रभागांतील उद्धवसेनेसह मित्र पक्षाच्या उमेदवारांची रविवारी भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते. 

उत्तर मुंबईतील प्रभाग १, ३, ४, ५, ६ आणि ७चे उद्धवसेना, मनसे आणि राष्ट्रवादी (शरद पवार) या पक्षाच्या उमेदवारांशी संवाद साधला. यावेळी शिवसेना उपनेते विनोद घोसाळकर, शिवसेना सचिव आ. मिलिंद नार्वेकर, विभागप्रमुख उदेश पाटेकर, विभाग संघटक शुभदा शिंदे यांच्यासह कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येन यावेळी उपस्थित होते. 

‘स्वर्गातून गंगा आणली आहे, याचे श्रेय घ्या’

कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्यांनी अभिषेक घोसाळकर यांची आठवण काढली आणि शिवसैनिक संकटातही एकत्रित राहिले याचे कौतुक केले. शिवसैनिकांना लोकांचे दुःख पाहवत नाही आणि महायुतीला मात्र लोकांचे सुख पाहवत नाही. त्यांना फक्त सत्तेची गाडी उबवायची आहे, अशी टीका उद्धव यांनी केली.

आम्ही मुंबईसाठी खूपच छोट्या गोष्टी केल्या आहेत. त्याचे श्रेय तुम्ही कशाला घेता? आमच्या कामांचे श्रेय घेण्यापेक्षा त्यांनी जी कामे केली आहेत, म्हणजे मोदींनी कैलास पर्वत बांधला, स्वर्गातून गंगा आणली आहे, याचे श्रेय घ्या, असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.

 

English
हिंदी सारांश
Web Title : To retain power, parties are splitting homes: Uddhav Thackeray

Web Summary : Uddhav Thackeray criticized the ruling coalition for splitting parties to retain power. He urged Shiv Sainiks to prepare to hoist the saffron flag atop the Mumbai Municipal Corporation. He mocked them for taking credit for small works.
टॅग्स :महानगरपालिका निवडणूक २०२६मुंबई महापालिका निवडणूक २०२६उद्धव ठाकरेशिवसेना