माजी आमदार, महापौरांच्या संपत्तीत झाली लक्षणीय वाढ; मालमत्तेचा विषय चर्चेचा ठरतोय
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 05:44 IST2026-01-09T05:44:02+5:302026-01-09T05:44:02+5:30
यंदाच्या निवडणुकीत माजी महापौर, माजी आमदारांनी उल्लेख केलेल्या मालमत्तेने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

माजी आमदार, महापौरांच्या संपत्तीत झाली लक्षणीय वाढ; मालमत्तेचा विषय चर्चेचा ठरतोय
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्रातून जाहीर झालेला संपत्तीचा तपशील चर्चेचा विषय ठरत आहे. विशेषतः माजी आमदार व माजी महापौरांच्या संपत्तीत लक्षणीय वाढ झाली आहे. २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीनंतर तब्बल ९ वर्षांनी पालिका निवडणूक होत आहे. त्यावेळी जाहीर केलेल्या संपत्तीच्या तुलनेत यंदाच्या निवडणुकीत माजी महापौर, माजी आमदारांनी उल्लेख केलेल्या मालमत्तेने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
भायखळा विधानसभेचे आ. मनोज जामसुतकर यांच्या पत्नी सोनम पुन्हा पालिका निवडणूक लढवत आहेत. २०१७ मध्ये त्या काँग्रेसच्या उमेदवार होत्या. तेव्हा ७ कोटी ८६ लाख ७९ हजार २८ रुपये इतकी संपत्ती त्यांनी जाहीर केली होती. यंदा त्या उद्धवसेनेकडून प्रभाग २१० मधून रिंगणात आहेत. त्यांची संपत्ती वाढून १४ कोटी ३८ लाख ८४ हजार २५९ रुपये झाली आहे.
२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत आ. जामसुतकर यांच्याकडून शिंदेसेनेच्या माजी आ. यामिनी जाधव पराभूत झाल्या. त्या पुन्हा पालिकेच्या रिंगणात उतरून प्रभाग २०९ मधून निवडणूक लढवत आहेत. विधानसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी १० कोटी १० लाख ९३ हजार ८९ रुपयांची मालमत्ता जाहीर केली होती. वर्षभरात त्यांच्या संपत्तीत चार कोटींची वाढ झाली आहे. पालिका निवडणुकीत त्यांनी १४ कोटी ५७ लाख ५९ हजार ८०४ रुपयांची मालमत्ता जाहीर केली आहे.
माजी महापौर कोट्यधीश
माजी महापौरांच्या संपत्तीतही वाढ झाली आहे. उद्धवसेनेच्या प्रभाग १९१ मधील उमेदवार विशाखा राऊत यांनी २१ कोटी ८३ लाख संपत्ती जाहीर केली आहे. २०१७ मध्ये त्यांची १४ कोटी ३७ लाख रुपये संपत्ती होती.
उद्धवसेनेचे प्रभाग १८२ मधील उमेदवार मिलिंद वैद्य यांची संपत्ती पाच पटीने वाढली आहे. त्यांची आता १३ कोटी ३९ लाख ८० हजार २६४ रुपयांची मालमत्ता आहे. २०१७ मध्ये ती केवळ २ कोटी १४ लाख रुपये होती.
वरळीकरांच्याही मालमत्तेत वाढ
माजी महापौर श्रद्धा जाधव यांनी यंदा ४६ कोटी ३४ लाख रुपयांची संपत्ती जाहीर केली असून, २०१७ मध्ये ती ४४ कोटी २९ लाख होती. माजी उपमहापौर हेमांगी वरळीकरांच्या संपत्तीतही वाढ दिसून येत आहे.
प्रभाग १९३ मधून निवडणूक लढविताना त्यांनी ७ कोटी १३ लाख ४४ हजार ३७५ रुपयांची मालमत्ता प्रतिज्ञापत्रात नोंद केली आहे. २०१७ मध्ये त्यांची संपत्ती १ कोटी ८५ लाख इतकी होती.