Join us
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसच्या बुडत्या जहाजाची अवस्था बिकट तरी सुरू आहे झुंज! 

By यदू जोशी | Updated: January 10, 2026 09:44 IST

काँग्रेसच्या बुडत्या जहाजाचे खलाशी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पक्षाला सावरण्यासाठी धडपड करत आहेत.

यदु जोशी, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : काँग्रेसच्या बुडत्या जहाजाचे खलाशी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पक्षाला सावरण्यासाठी धडपड करत आहेत. गतवैभवाच्या खुणा, बिकट वर्तमान आणि धूसर भवितव्य अशा अवस्थेत असलेल्या काँग्रेसला महापालिका निवडणुकीत काही ठिकाणी अस्तित्त्वासाठी झुंजावे लागत आहे, तर काही ठिकाणी सत्तेसाठी संघर्ष करावा लागत आहे. 

मुंबईत अध्यक्ष वर्षा गायकवाड स्वबळाचा नारा देत मैदानात उतरल्या आहेत. कोकण, उत्तर महाराष्ट्रात काँग्रेस दुर्बिणीतून बघावी लागत आहे. पश्चिम महाराष्ट्रात सतेज पाटील, विश्वजित कदम, खा. विशाल पाटील हे नेते बाजी लावत आहेत.

एकेकाळच्या गडात म्हणजे विदर्भातील चार महापालिकांमध्ये काँग्रेससमोर प्रचंड आव्हाने आहेत. विजय वडेट्टीवार, डॉ. नितीन राऊत, विकास ठाकरे, आ. अभिजित वंजारी, माजी मंत्री यशोमती ठाकूर, डॉ. सुनील देशमुख, आ. साजिद खान पठाण  किल्ला लढवत आहेत. अहिल्यानगरमध्ये बाळासाहेब थोरात काँग्रेसचे अस्तित्व राखण्यासाठी उतरले आहेत. 

मराठवाड्यात खा. कल्याण काळे, माजी मंत्री अमित देशमुख पक्षाच्या प्रतिष्ठेसाठी सरसावले आहेत. पण, विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवापासून निराशेच्या गर्तेत असलेल्या काँग्रेसची वाट बिकट दिसत आहे.

निवडणुकीसाठी अत्यावश्यक बनलेल्या पैशांची कमतरता, पूर्वीसारखे कार्यकर्त्यांचे मोहोळ नसणे, अंतर्गत समन्वयाचा अभाव, दिल्लीकडून मिळत नसलेले बळ आणि त्यातच परंपरागत मतदारांनी पाठ फिरविणे, हे काँग्रेसच्या डोकेदुखीचे काही मुद्दे. 

दलित, मुस्लिम आणि पंजाचा परंपरागत मतदार यावर मुख्यत्वे काँग्रेसची मदार असली तरी भाजप, शिंदेसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीत गेल्या काही महिन्यांत त्या - त्या भागातील वजनदार नेते काँग्रेसमधून गेले. जागोजागी पक्षाला खिंडार पडले. मुस्लिम मतदारांमध्ये एमआयएम हा मोठा वाटेकरी आला, त्यामुळे पक्षाची आणखी पीछेहाट होताना दिसते.

सपकाळ निष्ठेने चालताहेत ‘एकला चलो रे’ ची वाट...

केंद्र आणि राज्यात सत्ता नसल्याने आपले नेते, कार्यकर्त्यांना काँग्रेस आज काहीही देऊ शकत नाहीत. सभोवताली सत्तारुढ पक्षांनी आमिषांच्या उभ्या केलेल्या इमारतीत जाऊन राहणे अनेकांनी पसंत केले आहे. अनेक ठिकाणी अस्तित्त्वासाठी संघर्ष आहे. 

अशा अवस्थेतही प्रदेशाध्यक्ष सपकाळ छातीला माती लावून फिरत आहेत. भाजपवर तुटून पडत आहेत. अन्य पक्षांचे बडे नेते विमान, हेलिकॉप्टरने सभा करत असताना सपकाळ कारने एकेका दिवसात तीन - तीन सभा घेत आहेत. 

वंचित सोबतीला

नगर परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये काँग्रेसची कामगिरी त्यातल्या त्यात बरी राहिली होती. सपकाळ प्रदेशाध्यक्ष झाले तेव्हापासून त्यांनी स्वबळाचा नारा दिला असला तरी यावेळी महापालिकेत मुंबई, नांदेडमध्ये काँग्रेसने ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीशी मैत्री केली आहे. काँग्रेसच्या स्वबळाचे काय होते आणि ॲड. आंबेडकर सोबत आल्याने काय फायदा होतो, याचे उत्तर १६ जानेवारीला मिळेलच. 

English
हिंदी सारांश
Web Title : Congress struggles: Fading glory, internal strife, and a lone fight.

Web Summary : Congress faces challenges across Maharashtra, from internal discord to resource scarcity. Leaders strive to maintain presence amid defections and dwindling support. The party is hoping alliance with VBA will bring success.
टॅग्स :महानगरपालिका निवडणूक २०२६नगर पालिकाकाँग्रेस