निवडणुकीच्या आखाड्यात छोट्या पक्षांची मोठी उडी; उत्तर भारतीय विकाससेनेचे ११ उमेदवार रणांगणात
By सीमा महांगडे | Updated: January 10, 2026 11:30 IST2026-01-10T11:30:10+5:302026-01-10T11:30:10+5:30
उत्तर भारतीय विकाससेना, संभाजी ब्रिगेड, अखिल भारतीय सेना, भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) यांसारख्या पक्षांचे उमेदवारांनीही दंड थोपटले आहेत.

निवडणुकीच्या आखाड्यात छोट्या पक्षांची मोठी उडी; उत्तर भारतीय विकाससेनेचे ११ उमेदवार रणांगणात
सीमा महांगडे, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : महापालिका निवडणुकीच्या रिंगणात प्रमुख राजकीय पक्ष पूर्ण ताकदीने उतरले आहेत. एकीकडे त्यांना बंडखोर अपक्षांचे तगडे आव्हान उभे ठाकले असताना दुसरीकडे अनेक छोट्या पक्षांमुळे होणाऱ्या मत विभागणीचे आव्हानही त्यांना पेलावे लागणार आहे. यंदा ३१ छोट्या राजकीय पक्षांनी २२७ प्रभागांत १०० हून अधिक उमेदवार उतरवले आहेत. उत्तर भारतीय विकाससेना, संभाजी ब्रिगेड, अखिल भारतीय सेना, भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) यांसारख्या पक्षांचे उमेदवारांनीही दंड थोपटले आहेत.
एकीकडे २२७ निवडणूक प्रभागांत (अजित भाजप-शिंदेसेना-राष्ट्रवादी पवार)- रिपाइं महायुती, तर दुसरीकडे उद्धवसेना-मनसे-राष्ट्रवादी (शरद पवार) या राजकीय पक्षांनी आपले मातब्बर उमेदवार केले आहेत. उमेदवारी डावलल्याने अनेकांनी अपक्ष म्हणूनही अर्ज भरले आहेत. यातच अनेक छोटे पक्ष आपल्या राजकीय अस्तित्वासाठी धडपडत आहेत. अखिल भारतीय सेनेचे तीन उमेदवार, तर उत्तर भारतीय विकास सेनेने ११ प्रभागांत उमेदवार दिले आहेत. शेतकरी कामगार पक्षाचेही तीन, तर जनता सेक्युलर दलाचे चार, असे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
मत विभागणी अटळ
मत विभागणीमुळे प्रमुख पक्षांच्या जिंकण्याची गणिते बिघडू शकतात. त्यामुळे मोठ्या पक्षाच्या उमेदवारांना अपक्षांसोबत, छोट्या पक्षांचे उमेदवार किती मते घेतील, याची काळजी लागली आहे. अगदीच थोड्या मतांनी ज्या ठिकाणी निकाल बदलले आहेत, त्या ठिकाणी अशा उमेदवारांनीच महत्त्वाची भूमिका निभावल्याचा अनुभव आहे.