श्रीमंत उमेदवाराकडे ३० कोटी रुपयांची संपत्ती; सर्वांत कमी मालमत्ता मनसे उमेदवाराची
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 13:14 IST2026-01-08T13:14:35+5:302026-01-08T13:14:35+5:30
श्रीमंत नागरिकांचा परिसर म्हणून दक्षिण मुंबईची ओळख आहे.

श्रीमंत उमेदवाराकडे ३० कोटी रुपयांची संपत्ती; सर्वांत कमी मालमत्ता मनसे उमेदवाराची
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : श्रीमंत नागरिकांचा परिसर म्हणून दक्षिण मुंबईची ओळख आहे. मात्र, दक्षिण मुंबईतील कुलाबा, मलबार हिल आणि मुंबादेवी विधानसभा क्षेत्रात येणाऱ्या १५ महापालिका प्रभागांमध्ये प्रमुख राजकीय पक्षांमधून ३० कोटींची संपत्ती असलेला उमेदवार सर्वाधिक श्रीमंत ठरला आहे. तर १.६२ लाख हे सर्वांत कमी उत्पन्न मनसे उमेदवाराचे आहे.
२१३ ते २२७ या प्रभागांमध्ये जवळपास ७९ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. काँग्रेसचे प्रभाग २२१ मधील पृथ्वी जैन यांच्याकडे ३० कोटी संपत्ती आहे. त्यांच्यासमोर भाजपचे माजी आ. राज पुरोहित यांचे पुत्र आकाश रिंगणात आहेत. ते माजी नगरसेवक आहेत. त्यांची ६.७७ कोटी मालमत्ता आहे. दुसऱ्या क्रमांकाची ७.२३ कोटी रुपयांची संपत्ती भाजपचे सन्नी सानप या २१९ क्रमांकाच्या प्रभागातील उमेदवाराकडे आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर उद्धवसेनेचे २१५ प्रभागातील किरण बाळसराफ यांची ७कोटींची मालमत्ता आहे. ७.२३ कोटींची मालमत्ता दुसऱ्या क्रमांकाच्या उमेदवाराकडे आहे.
मनसेच्या तीनही उमेदवारांची मालमत्ता कमी असल्याचे प्रतिज्ञापत्रावरून दिसते. २१७मधील नीलेश शिरधनकर यांनी १.६२ लाख, २१४ मधील मुकेश भालेराव यांनी २.५ कोटी आणि २२३ मधील प्रशांत गांधी यांनी ४.९२ लाख स्थावर आणि जंगम मालमत्ता जाहीर केली आहे.
प्रभागनिहाय सर्वाधिक श्रीमंत तीन उमेदवार
| प्रभाग क्रमांक | उमेदवाराचे नाव | पक्ष | मालमत्ता |
| २२१ | पृथ्वी जैन | काँग्रेस | ३०.५४ कोटी |
| २९१ | सन्नी सानप | भाजप | ७.२३ कोटी |
| २१५ | किरण बाळसराफ | उद्धवसेना | ७.०० कोटी |
सर्वात कमी संपत्ती असलेले तीन उमेदवार
| प्रभाग क्रमांक | उमेदवाराचे नाव | पक्ष | मालमत्ता |
| २१७ | नीलेश शिरधनकर | मनसे | १.६२ लाख |
| २१४ | मुकेश भालेराव | मनसे | २.०५ लाख |
| २२३ | प्रशांत गांधी | मनसे | ४.९२ लाख |