झेंडे, बिल्ले, टोप्यांचे दर वधारले; प्रचार साहित्याला मोठी मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 13:25 IST2026-01-08T13:25:55+5:302026-01-08T13:25:55+5:30
१५ लाखांच्या मर्यादेमुळे खर्च करताना उमेदवारांपुढे पेच

झेंडे, बिल्ले, टोप्यांचे दर वधारले; प्रचार साहित्याला मोठी मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मतदानाचा दिवस जवळ येत असल्याने उमेदवारांच्या प्रचाराने चांगलाच वेग घेतला आहे. घरोघरी जाऊन मतदारांशी संवाद साधण्यावर अनेक उमेदवार भर देत आहेत. प्रचारावेळी टापटीप दिसण्याची विशेष खबरदारी उमेदवार व कार्यकर्ते घेत आहेत. त्याकरिता शाही उपरणाला सर्वाधिक पसंती दिली जात आहे. मात्र, टोपी, बिल्ले, बेंज यांच्या मोठ्या मागणीमुळे त्यांच्या दरांतही मोठी वाढ झाल्याचे जाणकारांनी सांगितले.
निवडणूक आयोगाने प्रत्येक उमेदवारासाठी १५ लाख रुपयांची खर्च मर्यादा निश्चित केली आहे. त्या मर्यादेत राहून उमेदवारांना प्रचारासाठी खर्च करावा लागणार आहे. मात्र, प्रचार साहित्याचे वाढलेले दर पाहता खर्चाचा ताळमेळ बसविण्याची कसरत उमेदवारांना करावी लागत आहे.
राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय पक्षांचे चिन्ह कायम असल्याने त्या पक्षांच्या उमेदवारांकडून मोठ्या प्रमाणात एकसारख्या प्रचार साहित्याची खरेदी होत आहे. मात्र, अपक्ष उमेदवारांना वेगवेगळी चिन्हे मिळाल्याने आपले चिन्ह मतदारांपर्यंत पोहोचविण्यासाठी टी-शर्ट, बिल्ले, टोप्यांवर चिन्ह छापण्यासाठी दुकानदारांकडे विशेष ऑर्डर द्याव्या लागत आहेत.
स्वतंत्र कार्यकर्ते नियुक्त
प्रचार रॅली, चौक सभा आणि कॉर्नर सभांमधून आपल्या पक्षाकडे कार्यकर्त्यांची मोठी फौज असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न उमेदवारांकडून केला जात आहे. मात्र, कार्यकर्त्यांचा दिवसभराचा खर्च सांभाळताना अनेक उमेदवारांची तारांबळ उडत आहे.
निवडणूक आयोगाला दररोजच्य खर्चाची नोंद सादर करणे बंधनकारक आहे. त्यामुळे अनेक उमेदवारांनी कागदपत्रांची पूर्तता, प्रचारासाठी परवानगी, खर्चाचा हिशेब ठेवण्यासाठी स्वतंत्र कार्यकर्त्यांची नेमणूक केली आहे. वाढता खर्च, कडक नियम व मतदारांपर्यंत पोहोचण्याच्या स्पर्धेमुळे निवडणूक उमेदवारांसाठी चांगलीच आव्हानात्मक ठरत आहे.
काही राजकीय पक्षांनी त्यांच्या उमेदवारांसाठी बिल्ले, बॅच, टोप्या, उपरणे यांची घाऊक खरेदी केली आहे. त्या-त्या पक्षांकडून त्यांना ते साहित्य दिले जाईल. मात्र, अपक्ष उमेदवारांची चिन्हे बनविण्यासाठी आम्हाला विशेष मेहनत करावी लागत आहे. जास्त ऑर्डर असल्यास भाव कमी असतो. पण, ऑर्डर कमी असल्यास भाव वाढतो. एका टोपीची किंमत होलसेलमध्ये साधारण १० रुपये आहे. मात्र, पक्षाचे चिन्ह एक रंग किंवा दोन रंगांमध्ये छापून घेतल्यास त्याची किंमत वाढून तीच टोपी २५ ते ३० रुपयांपर्यंत विकली जाते. - शाम राजपूत, होलसेल विक्रेता, मस्जिद बंदर