मुंबई महापालिकेची आयटी यंत्रणा हलेना, उमेदवारांची माहिती मिळेना; निवडणुकीला अवघा आठवडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 09:12 IST2026-01-06T09:12:22+5:302026-01-06T09:12:22+5:30
माहिती मतदारांना मिळत नसेल तर मुंबईचा अर्थसंकल्प ७५ हजार कोटींचा असून उपयोग काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

मुंबई महापालिकेची आयटी यंत्रणा हलेना, उमेदवारांची माहिती मिळेना; निवडणुकीला अवघा आठवडा
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : पालिका निवडणुकीच्या मतदानाला अवघा आठवडा शिल्लक आहे. सर्व राजकीय पक्षांच्या उमेदवारांच्या प्रचाराने निवडणुकीचे वातावरण तापले आहे. मात्र यात उमेदवारांची शपथपत्रे पालिका प्रशासनकडून मुंबईकरांना तांत्रिक अडचणींचे कारण देऊन दिली जात नाहीयेत. पालिकेच्या आयटी यंत्रणेच्या सुस्तपणामुळे कोणत्या उमेदवाराची संपत्ती किती ? शिक्षण किती ? त्यांच्यावर काही फौजदारी गुन्हा दाखल आहे का या सगळ्याची माहिती मतदारांपासून लपवली जात आहे. ही माहिती मतदारांना मिळत नसेल तर मुंबईचा अर्थसंकल्प ७५ हजार कोटींचा असून उपयोग काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
राज्यातील सर्व २९ महानगरपालिकांनी निवडणुकीसंदर्भातील माहिती एकाच ठिकाणी मतदारांपर्यंत पोहचवण्याची जबाबदारी संबंधित पालिकांची आहे. मुंबई महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर ती मिळणे अपेक्षित आहे. मात्र मुंबई महानगरपालिकेकडून दुबार मतदारणाच्या यादीपासून ते अंतिम उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्रापर्यंत सर्वच माहिती उशिराने संकेतस्थळावर देण्यात आली आहे.
शनिवारी ३ डिसेंबर रोजी रात्री उशिरा अंतिम उमेदवारांची यादी जाहीर होऊनही अद्याप उमेदवारांची शपथपत्रे अपलोड झाली नाहीत. मतदान केंद्रनिहाय मतदारांच्या याद्या तयार आहेत मात्र त्या संकेत स्थळावर नाहीत. मुंबईत विविध राजकीय पक्षांचे १७०० उमेदवार असल्याने माहिती सादर करण्यास वेळ लागत आहे, शिवाय यंत्रणेवर अतिरिक्त भारामुळे संकेतस्थळावर परिणाम होण्याची शक्यता असल्याचे कारण पुढे केले जात आहे. त्यामुळे माहिती न देणे हा देखील निवडणूक आयोगाच्या दृष्टीने गुन्हा ठरतो का ? अशी विचारणा आता होत आहे.
दोष यंत्रणेचा की अधिकाऱ्यांचा?
निवडणूक अधिकारी कार्यालयांना उमेदवारांची प्रतिज्ञापत्रे प्राप्त आहेत, त्यांची माहिती पालिकेला पाठवण्यात आली आहे. मात्र तंत्रज्ञान विभागाकडून ती माहिती अपलोड करण्यात आलेली नाही. दरम्यान काही अधिकारी ही माहिती उपलब्ध होणार आहे कि नाही ? झाली कि नाही ? याबद्दल काहीही सांगत नाहीत.