मुंबई भाजप अध्यक्षांची प्रतिष्ठा अंधेरीत पणाला
By मनोहर कुंभेजकर | Updated: January 10, 2026 10:33 IST2026-01-10T10:33:29+5:302026-01-10T10:33:29+5:30
उद्धवसेना आणि मनसे युतीने केलेल्या आक्रमक मोर्चेबांधणीने या मतदारसंघात चुरस वाढली आहे.

मुंबई भाजप अध्यक्षांची प्रतिष्ठा अंधेरीत पणाला
मनोहर कुंभेजकर लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघात यंदा राजकीय वातावरण चांगलेच तापले असून येथील लढत भाजपचे मुंबई अध्यक्ष आ. अमित साटम यांच्यासाठी प्रतिष्ठेची आहे.
उद्धवसेना आणि मनसे युतीने केलेल्या आक्रमक मोर्चेबांधणीने या मतदारसंघात चुरस वाढली आहे. आ. साटम यांचा मेहुणा व माजी नगरसेवक रोहन राठोड दुसऱ्यांदा प्रभाग ६८ मधून भाजपकडून रिंगणात उतरले आहेत.
२०१४ पासून भाजपचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या अंधेरी पश्चिममध्ये यावेळी मतदारांचा कल नेमका कोणत्या दिशेने जाईल, याबाबत उत्सुकता आहे.
मुंबईची धुरा वाहताना आ. साटम यांनी विकासकामांचा दाखला देत पुन्हा येथील मतदारांचा विश्वास मिळविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मात्र, विरोधकांकडून स्थानिक प्रश्न, नागरी समस्या आणि काही भागांतील सत्ताधाऱ्यांविरोधातील नाराजीवर प्रचार केला जात आहे.
प्रभाग क्रमांक ७० मध्ये भाजपचे माजी नगरसेवक अनिष मकवानी, उद्धवसेनेचे प्रसाद नागवकर, काँग्रेसचे भूपेंद्र शिनगारे यांच्यात लढत आहे. प्रभाग क्रमांक ७१ मध्ये भाजपच्या माजी नगरसेविका सुनीता मेहता, उद्धवसेनेच्या श्रद्धा प्रभू आणि अपक्ष उमेदवार अजिता जानावळे यांच्यात लढत आहे.
मनसेचे धुरी- उद्धवसेनेचे बंडखोर सणस विरोधात
प्रभाग क्रमांक ६५ मध्ये भाजपचे बंदेरी तिप्पाण्णा, उद्धवसेनेचे प्रसाद आयरे, काँग्रेसचे हैदर सुफियां मोहसीन खान यांच्यात तिरंगी लढत आहे. प्रभाग क्रमांक ६६ मध्ये आरती पांड्या (भाजप), सनाह मोहमद इसा खान (उद्धवसेना), हैदर मेहेर मोहसीन यांच्यात चुरत आहे. प्रभाग क्रमांक ६७ मध्ये भाजपचे दीपक कोतेकर, मनसेचे कुशल धुरी आणि उद्धवसेनेचे बंडखोर दीपक सणस यांच्यात सामना होईल.
प्रभाग क्रमांक ६८ मध्ये भाजपचे माजी नगरसेवक रोहन राठोड, मनसेचे संदेश देसाई यांच्यातील लढत लक्ष्यवेधी ठरणार आहे. प्रभाग क्रमांक ६९ मध्ये माजी नगरसेविका सुधा सिंग, उद्धवसेनेचे योगेश गोरे आणि काँग्रेसचे प्रकाश येडगे आमनेसामने आहेत.