‘मायावी’ महामुंबईसाठी राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्यांचे ‘जाळे’; भाजप-शिंदेसेनेचा जाहीरनामा कधी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 06:13 IST2026-01-06T06:12:34+5:302026-01-06T06:13:06+5:30
लाडक्या बहिणींकरिता भाजप व शिंदेसेना आपल्या पोतडीतून काय बाहेर काढणार, याची प्रचंड उत्सुकता आहे.

‘मायावी’ महामुंबईसाठी राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्यांचे ‘जाळे’; भाजप-शिंदेसेनेचा जाहीरनामा कधी?
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई/ठाणे : महामुंबईतील महापालिका निवडणुकीत एकीकडे मराठी विरुद्ध परप्रांतीय किंवा कुठल्या धर्माचा महापौर होणार, अशा मुद्द्यांवरून घमासान सुरू असताना दुसरीकडे विकासाची लढाई सुरू आहे. मुंबई महानगर प्रदेशातील रस्ते, उड्डाणपूल, मेट्रोची कामे, कोस्टल रोड, सेतू आदींचे दाखले देत सत्ताधारी भाजप, शिंदेसेना विकासासाठी मते मागत आहेत.
प्रचाराला वेग येत असतानाच आता सर्वच राजकीय पक्षांचे जाहीरनामे, वचननामे यांना महत्त्व आले आहे. विरोधी पक्षांपैकी उद्धव आणि राज ठाकरे बंधूंनी रविवारी आपला संयुक्त वचननामा जाहीर केला. सत्ताधारी भाजप-शिंदेसेनेचा जाहीरनामा येत्या दोन दिवसांत प्रकाशित होईल, अशी माहिती मिळाली आहे. जाहीरनामे, वचननामे यांच्यानिमित्तानेही परस्परांवर टीकास्त्र सोडण्याची संधी राजकीय पक्षांना मिळत असते.
मुंबई भाजप आणि शिंदेसेनेचा जाहीरनामा येत्या दोन दिवसांत प्रसिद्ध केला जाईल. मुंबईतील विविध विषयांबाबत सखोल अभ्यास करून आम्ही सर्वंकष असा जाहीरनामा तयार केला असून, एक-दोन दिवसांत प्रकाशित केला जाईल, असे मुंबई भाजपचे मुख्य प्रवक्ते निरंजन शेट्टी यांनी सांगितले. भाजप आणि शिंदेसेनेचे जाहीरनामे वेगवेगळे असतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.
उद्धवसेना व मनसे यांनी रविवारी जाहीर केलेल्या वचननाम्यात मुंबईमध्ये दहा रुपयांत जेवण देण्याची घोषणा केली. त्यांची सत्ता आल्यास घरकाम करणाऱ्या महिलांना दरमहा १,५०० रुपये, महापालिकेचे स्वत:चे गृहनिर्माण प्राधिकरण, पाच वर्षांत एक लाख मुंबईकरांना परवडणारी घरे अशी आश्वासनांची खैरात ठाकरे बंधूंनी केली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात दहा रुपयांत शिवभोजन थाळी देणारी केंद्रे सुरू झाली होती. मात्र महाविकास आघाडीचे सरकार गेल्यावर अनुदानाअभावी ही केंद्रे बंद झाली. ठाकरे बंधूंच्या या वचननाम्यावर भाजप, शिंदेसेनेने टीकेची संधी सोडली नाही.
भाजप, शिंदेसेनेकडून लाडक्या बहिणींसाठी अजून काय?
भाजप व शिंदेसेना यांचा जाहीरनामा व वचननाम्याबद्दल उत्सुकता आहे. विधानसभा निवडणुकीवेळी लाडकी बहीणसारखी योजना सुरू करून सत्ताधाऱ्यांनी जोरदार मुसंडी मारली. त्यामुळे महामुंबईतील नागरिकांकरिता व मुख्यत्वे लाडक्या बहिणींकरिता हे पक्ष आपल्या पोतडीतून काय बाहेर काढणार, याची प्रचंड उत्सुकता आहे. लाडकी बहीण योजनेचे श्रेय घेण्यावरून भाजप, शिंदेसेनेच्या नेत्यांमध्ये स्पर्धा पाहायला मिळाली. भाजप, शिंदेसेना याचे स्वतंत्र जाहीरनामे प्रसिद्ध झाले तर त्यात कोण अधिक लोकप्रिय घोषणा करतो, याची स्पर्धा लागलेली दिसेल.
काँग्रेस, वंचितच्या जाहीरनाम्यांत असणार काय?
काँग्रेसचा जाहीरनामा उद्या (मंगळवारी) प्रसिद्ध होत आहे. या जाहीरनाम्यात काय असेल, याचे संकेत काँग्रेसने यापूर्वी दिले. काँग्रेससोबत युतीत असणाऱ्या वंचित बहुजन आघाडीचा जाहीरनामाही उद्या प्रकाशित होणार आहे. गेल्या तीन वर्षांतील पालिकेच्या कारभाराला लक्ष्य करत काँग्रेसने महायुतीवर टीकेची झोड उठवण्याचे काम सुरू केले. मुंबईकरांसाठी काँग्रेसच्या पोतडीत काय आहे, ते मंगळवारी स्पष्ट होईल. वंचितच्या जाहीरनाम्यात काय असेल, याविषयीही उत्सुकता आहे.