१४ प्रभागांमध्ये माजी नगरसेवकांचा 'महामुकाबला'
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 13:20 IST2026-01-09T13:20:11+5:302026-01-09T13:20:11+5:30
या तिरंगी, दुरंगी लढतीत निवडायचे तरी कुणाला? असा प्रश्न मतदारांपुढे आहे.

१४ प्रभागांमध्ये माजी नगरसेवकांचा 'महामुकाबला'
महेश पवार, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : कधी एकाच पक्षात असणारे माजी नगरसेवक यंदा एकमेकांविरोधात दंड थोपटून मैदानात उतरले आहेत. १४ प्रभागांमध्ये माजी नगरसेवकांचा 'मुकाबला' होणार आहे. त्यामुळे या तिरंगी, दुरंगी लढतीत निवडायचे तरी कुणाला? असा प्रश्न मतदारांपुढे आहे.
प्रभाग १६९ मध्ये उद्धवसेनेने प्रविणा मोरजकर यांना उमेदवारी दिली. त्यामुळे इच्छुक उमेदवार कमलाकर नाईक नाराज झाले. त्यांनी बंडखोरी केली आणि अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरला आहे. आता येथे एकाच पक्षाचे दोन माजी नगरसेवक लढत देत असले तरी एक अधिकृत व एक बंडखोर असा सामना रंगत आहे.
प्रभाग ५ मध्ये उद्धवसेनेतून शिंदेसेनेत आलेले संजय घाडी व उद्धवसेनेच्या सुजाता पाटेकर यांच्यात लढत होत आहे. २०१७ च्या निवडणुकीत दोघे विजयी झाले होते. त्यावेळी घाडी प्रभाग ५ चे, तर पाटेकर प्रभाग ४ च्या प्रतिनिधित्व करत होत्या. मात्र, आरक्षण व पक्षबदलामुळे आता हे दोघेही तुल्यबळ उमेदवार एकमेकांना लढत देत आहेत.
प्रभाग ६९ मध्ये उद्धवसेनेतून शिंदेसेनेत गेलेले राजू पेडणेकर आणि उद्धवसेनेत प्रवेश केलेले चंगेझ मुलतानी यांच्यात लढत आहे. ज्येष्ठ नगरसेविका तृष्णा विश्वासराव यांनीही शिंदेसेनेत प्रवेश केला. २०२७ मध्ये पराभूत झालेल्या विश्वासराव यावेळी पुन्हा प्रभाग १८० मधून निवडणूक लढवीत असून उद्धवसेनेच्या स्मिता गावकर यांच्याशी त्यांचा सामना होत आहे.
प्रभाग २०६ मध्ये तिघे रिंगणात
प्रभाग क्रमांक २०६ मध्ये तीन माजी नगरसेवक एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. शिंदेसेनेत गेलेले नाना आंबोले, उद्धवसेनेचे सचिन पडवळ व राष्ट्रवादी (अजित पवार) चे रामवचन मुराई हे तिघेही एकाच वेळी नशीब आजमावत आहेत.