जनतेचे प्रश्न सोडवण्याचा दावा करणाऱ्या नेत्यांनाच प्रचारसभांसाठी मैदान मिळेना...!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 05:35 IST2026-01-07T05:34:23+5:302026-01-07T05:35:42+5:30
निवडणुकीपूर्वी कुठले मैदान कोण मारणार? ठाकरे बंधू आणि भाजप-शिंदेसेनेचा शिवाजी पार्ककरिता अर्ज : नगरविकास विभागाच्या कोर्टात निर्णयाचा चेंडू, काहींच्या जागा मिळेल तेथे सभा

जनतेचे प्रश्न सोडवण्याचा दावा करणाऱ्या नेत्यांनाच प्रचारसभांसाठी मैदान मिळेना...!
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई/ठाणे : लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी निवडून द्या, असे म्हणणाऱ्या विविध पक्षांतर्फे नगरसेवक होऊ इच्छिणाऱ्यांना आणि त्यांच्या नेत्यांना स्वत:च्या प्रचारसभेसाठी मैदान मिळवताना नाकीनऊ येत आहेत. ज्यांना स्वत:साठी मैदान मिळवता येत नाही, ते आमच्यासाठी काय मैदान मारणार, असा प्रश्न मतदारच करत आहेत.
येत्या १५ जानेवारीला होणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठी शेवटच्या टप्प्यातील प्रचारासाठी दादरचे शिवाजी पार्क मैदान मिळावे, याकरिता भाजप-शिंदेसेना, उद्धवसेना-मनसे यांनी अर्ज केल्याची माहिती महापालिका अधिकाऱ्यांनी दिली. हे अर्ज आता नगरविकास विभागाकडे पाठवण्यात आले असून, निर्णय होणे बाकी आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बुधवारी ठाण्याच्या दौऱ्यावर असून, उल्हासनगर, कल्याण येथे त्यांच्या सभा होत आहेत. तसेच ठाण्यात सायंकाळी मुलाखतीचा कार्यक्रम आयोजित केला आहे.
दादरमधील शिवाजी पार्कचे मैदान राजकीय पक्षांच्या सभांचे, घडामोडींचे साक्षीदार राहिले आहे. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासह मनसेचा गुढीपाडवा मेळावा येथे होतो. येथे सभा घेण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये चढाओढ असते. सभेसाठी मोठ्या आकाराचे व्यासपीठ उभारण्यासाठी मैदान खणले जाते. तसेच झेंडे, मोठी स्क्रीन बसवण्यासाठी बांबू बसवण्यात येतात. राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या शिवाजी पार्कबद्दल उत्सुकता आहे.
११, १२, १३ जानेवारीला मागणी
ठाकरे बंधू, भाजप-शिंदेसेना युतीने ११, १२, १३ जानेवारीला शिवाजी पार्क मिळावे, यासाठी अर्ज केला आहे. प्रचाराचा शेवटचा रविवार असल्याने ११ जानेवारी तसेच १३ जानेवारीला प्रचाराची सांगता होणार असल्याने सभेचे मैदान कोण मारणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ठाण्यात गावदेवी मैदानावर ठाकरे बंधू
शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे आणि ठाण्यातील गावदेवी मैदान हे अतूट समीकरण राहिले आहे. याच मैदानावर ८ किंवा ११ जानेवारी रोजी ठाकरेबंधूंची संयुक्त सभा होणार आहे. याखेरीज कोपरी येथील अष्टविनायक चौकात मनसे अध्यक्ष राज ठाकरे सभा घेणार आहेत. ठाणे महापालिका मुख्यालयासमोरील रस्ता आणि गडकरी रंगायतनसमोरील रस्ता येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा होईल, अशी शक्यता आहे. मुख्यमंत्री फडणवीस उद्या (बुधवारी) ठाणे येथे असून सायंकाळी सात वाजता त्यांची मुलाखत गडकरी रंगायतन येथे होणार आहे. अभिनेत्री तेजश्री प्रधान ही मुलाखत घेतील.
२५० रुपये अधिक जीएसटी
सध्या राजकीय सभा, तसेच धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी शिवाजी पार्क मैदानातील जागा देताना मुंबई महापालिका अवघे २५० रुपये अधिक जीएसटी एवढे शुल्क आकारते, तर २० हजार रुपये अनामत रक्कम घेते.
नवी मुंबईत ७० मैदाने
मनसे-उद्धवसेना या पक्षांनी ९ किंवा १० जानेवारी रोजी नेरूळ श्री रामलीला मैदानाची मागणी केली आहे. भाजपने १२ जानेवारीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेकरिता दिवा कोळीवाडा मैदानाची मागणी केली. शिंदेसेनेने नियोजन केलेले नाही. राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाची सभा होणार आहे; पण ठिकाण व मैदान निश्चित नाही. ७० मैदानांपैकी सभांसाठी ३० राखीव आहेत.
‘बीकेसी’वर कोणाची सभा? एमएमआरडीए माहिती देईना
एमएमआरडीएच्या बीकेसी (वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स) मैदानालाही मागणी आहे. राजकीय पक्षांकडून या मैदानासाठीही अर्ज केल्याचे समजते. मात्र, आचारसंहितेचे कारण सांगत कोणी अर्ज केले आहेत, याची माहिती देण्यास एमएमआरडीएने नकार दिला. एमएमआरडीएकडून बीकेसी येथे होणाऱ्या सभांसाठी २८ रुपये प्रतिचौरस मीटर असे शुल्क आकारण्यात येते.
आज देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे यांच्या सभा
कल्याण-डोंबिवली महापालिकेची सात मैदाने राजकीय सभांसाठी आरक्षित आहेत. त्यामध्ये कल्याणमध्ये फडके मैदान, यशवंतराव चव्हाण मैदान, दादासाहेब गायकवाड मैदान, देवळेकर मैदान, डोंबिवलीत भागशाळा, डाेंबिवली क्रीडा संकुल, नेहरू मैदानाचा समावेश आहे. उद्या (बुधवारी) भागशाळा मैदानात मनसे अध्यक्ष राज ठाकरे, उद्याच खडेगोळवली परिसरात खासगी मैदानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा होणार आहे.
पनवेल : १४ मैदाने कळंबोली सेक्टर १९ मधील मैदानाच्या मागणीसाठी भाजपचा एकमेव अर्ज आला असून १२ जानेवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा होणार आहे. पनवेलमध्ये १४ मैदाने आहेत.