लखपतीचे झाले करोडपती!; ७२ व्या वर्षीही शर्यतीत, प्रतिज्ञापत्रांनी उघडली मालमत्तांची गुपिते
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 13:14 IST2026-01-09T13:14:35+5:302026-01-09T13:14:35+5:30
उद्धवसेनेचे ७२ वर्षांचे सुरेश शिंदे पाचव्यांदा मतदारांचे दार ठोठावत आहेत.

लखपतीचे झाले करोडपती!; ७२ व्या वर्षीही शर्यतीत, प्रतिज्ञापत्रांनी उघडली मालमत्तांची गुपिते
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: चार-पाच टर्म नगरसेवक राहिलेल्यांच्या संपत्तीत आठ-दहा वर्षांत ७ ते १० कोटी रुपयांची भर पडली आहे. भांडुपच्या प्रभाग क्रमांक १०९ मधून उद्धवसेनेचे ७२ वर्षांचे सुरेश शिंदे पाचव्यांदा मतदारांचे दार ठोठावत आहेत.
२००७ मध्ये ३ लाख १९ हजार रुपये त्यांची संपत्ती होती. आता ४ कोटी २५ लाख झाली आहे. त्यात ३ कोटी ३९ लाखांची स्थावर संपत्ती, तर ७९ लाखांचे कर्ज असल्याची नोंद प्रतिज्ञापत्रात आहे. भाजपचे प्रकाश गंगाधरे (७२) चौथ्यांदा रिंगणात आहेत.
मागील निवडणुकीत त्यांची २ कोटी ४७ लाख संपत्ती होती. आता १२ कोटी ८८ लाखांवर पोहोचली आहे. त्यांचे कर्ज १ कोटी ८७लाखांवरून ३ कोटी ८८ लाखांवर गेले आहे. मुलुंड, भिवंडी व गोवा येथे मालमत्ता असल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद आहे.
प्रभाग क्रमांक १०६ मध्ये पाचव्यांदा लढणारे प्रभाकर शिंदे यांची मालमत्ता १७ कोटी ६३ लाख रुपये आहे. २०१७ मध्ये ती ११.९० कोटी होती.
नील सोमय्यांची मालमत्ता ९ कोटींची
दुसऱ्यांदा निवडणूक लढवणारे नील सोमय्या यांची संपत्तीही लक्षवेधी ठरली आहे. मागील वेळी १ कोटी ९९ लाख असलेली मालमत्ता यावर्षी ९ कोटी ८९ लाखांवर गेली आहे. भांडुपमधील उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका दीपमाला बढे यांची मालमत्ता गेल्या निवडणुकीच्या तुलनेत तिपटीने वाढली आहे. त्यांची संपत्ती ३ कोटी ३० लाखांवरून १० कोटी ७७लाखांवर पोहोचली आहे. त्याचवेळी कर्ज १ कोटी १४ लाखांवरून ४६ लाखांवर झाले आहे.
७६ लाखांवरून ५५ कोटी
कलिना विधानसभेतील प्रभाग क्रमांक १६६ चे शिंदेसेनेच्या उमेदवार मीनल तुर्डे यांनी २०१२ मध्ये कुटुंबाची मालमत्ता ७६ लाख १३ हजार ६०० रुपये जाहीर केली होती. आता त्यांची ५५ कोटी १७ लाख ५० हजार ८४२ रुपये एवढी मालमत्ता आहे. मीनल यांचे पती संजय तुर्डे हे २०१७ मध्ये याच प्रभागातून मनसेच्या तिकिटावर नगरसेवक म्हणून विजयी झाले होते. दोघांच्या नावावर शेती असून, व्यापार म्हणून वाईन शॉपची नोंद आहे.
महिला उमेदवाराचे कुटुंब २८ कोटींचे धनी
भाजप उमेदवार अनिता वैती (६०) या माजी नगरसेवक नंदकुमार वैती यांच्या पत्नी आहे. २००७ मध्ये निवडणुकीच्या रिंगणात असताना त्यांची संपत्ती सात लाख रुपये होती. प्रतिज्ञापत्रात आता त्यांच्या कुटुंबाची मालमत्ता २८ कोटी ८८ लाख आहे. स्थावर मालमत्ता २८ कोटी ७१ लाख रुपये आहे.