उत्तर मुंबईत अपक्षांचीही कोटीच्या कोटी 'उड्डाणे'; शिंदेसेनेच्या उमेदवारांच्या संपत्तीत सर्वाधिक वाढ
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 13:10 IST2026-01-09T13:10:38+5:302026-01-09T13:10:38+5:30
मुंबई महापालिका निवडणुकीच्या रिंगणात असलेले उत्तर मुंबईतील अनेक उमेदवार कोट्यधीश आहेत.

उत्तर मुंबईत अपक्षांचीही कोटीच्या कोटी 'उड्डाणे'; शिंदेसेनेच्या उमेदवारांच्या संपत्तीत सर्वाधिक वाढ
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीच्या रिंगणात असलेले उत्तर मुंबईतील अनेक उमेदवार कोट्यधीश आहेत. काही उमेदवारांची गेल्या निवडणुकीनंतर मालमत्ता दुप्पट ते पाचपट वाढली आहे. प्रभाग क्रमांक १८ च्या शिंदेसेनेच्या उमेदवार संध्या दोशी यांच्या मालमत्तेत २०१७ पासून १६ कोटींची वाढ झाली आहे. ती ३ कोटींवरून १९ कोटी झाली आहे.
प्रभाग क्रमांक २ च्या भाजपच्या उमेदवार तेजस्वी घोसाळकर यांच्याही संपत्तीत मागील ८ वर्षात ४.७५ कोटींची वाढ झाली आहे. प्रभाग १२ च्या अपक्ष उमेदवार प्रीती दांडेकर यांच्याकडे ११ कोटींची मालमत्ता आहे. महापालिकेच्या रिंगणात १,७०० उमेदवार आहेत. उत्तर मुंबईत कांदिवली पूर्व, बोरीवली, चारकोप, दहिसर आणि मालाडचा काही भाग येतो.
१३ कोटींचे मालक
विविध प्रभांगातील उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्रातून उमेदवारांची शैक्षणिक पात्रता, वार्षिक उत्पन्न आणि जंगम-स्थावर मालमत्तेची माहिती समोर आली आहे. गेल्या ८ वर्षात माजी नगरसेवकांच्या संपत्तीत कोट्यवधींची वाढ झाली आहे.
प्रभाग ९ मधील उद्धवसेनेच्या संजय भोसले यांची संपत्ती १३ कोटी आहे. विधानसभा निवडणुकीनंतर त्यांची संपत्ती आता २ कोटींनी वाढली आहे. तर प्रभाग ९ मधून लढणाऱ्या भाजपच्या शिव शेट्टी यांच्या मालमत्तेत १३ वर्षांत ८ कोटींची वाढ आहे.
उमेदवारांनी प्रतिज्ञापत्रात जाहीर केलेली संपत्ती...
| प्रभाग क्रमांक | उमेदवाराचे नाव | पक्ष | एकूण संपत्ती | संपत्तीतील वाढ |
| प्रभाग १२ | प्रीती दांडेकर | अपक्ष | ११ कोटी | १० कोटी |
| प्रभाग १७ | शिल्पा सांगोरे | भाजप | १२ कोटी | ९ कोटी |
| प्रभाग १८ | संध्या दोशी | शिंदेसेना | १९ कोटी | १६ कोटी |
| प्रभाग ९ | शिवा शेट्टी | भाजप | ९ कोटी | ८ कोटी |
| प्रभाग ९ | संजय भोसले | उद्धवसेना | १३ कोटी | २ कोटी |
| प्रभाग ५ | संजय घाडी | शिंदेसेना | १२ कोटी | ३ कोटी |
| प्रभाग २० | दीपक तावडे | भाजप | १२ कोटी | ७ कोटी |