मुंबईकरांना वीज, पाणी, शिक्षण, आरोग्य सेवा मोफत; ‘आप’ने दिली गॅरंटी, जाहीरनामा केला प्रसिद्ध
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 11:03 IST2026-01-01T10:58:45+5:302026-01-01T11:03:11+5:30
BMC Election 2026 AAP News: चार गोष्टी मुंबईकरांना मोफत देण्याचे आश्वासन ‘केजरीवालची गॅरंटी’ अंतर्गत आम आदमी पक्षाने जाहिरनाम्यामध्ये दिले.

मुंबईकरांना वीज, पाणी, शिक्षण, आरोग्य सेवा मोफत; ‘आप’ने दिली गॅरंटी, जाहीरनामा केला प्रसिद्ध
BMC Election 2026 AAP News: दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष मुंबई महानगरपालिका निवडणूक लढवत आहे. सुमारे ७५ जागांवर आम आदमी पक्षाने उमेदवार दिले आहेत. मुंबईकरांना २४ तास मोफत पाणी, मोफत वीज, शिक्षण आणि आरोग्य सेवा मोफत देण्याचे आश्वासन आप पक्षाकडून देण्यात आहे. माजी मुख्यमंत्री आणि आप नेत्या आतिशी यांनी मुंबईतील विकासावर बोलताना सत्ताधाऱ्यांवर टीका केली.
आम आदमी पक्षाने मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी जाहीरनामा नुकताच प्रसिद्ध केला. दिल्ली आणि पंजाबमधील यशस्वी प्रशासन मॉडेलवर आधारित पाणी, शिक्षण, वीज आणि दवाखाना या चार गोष्टी मुंबईकरांना मोफत देण्याचे आश्वासन ‘केजरीवालची गॅरंटी’ या अंतर्गत ‘आप’ने जाहिरनाम्यामध्ये दिले आहे. अफाट संपत्ती असूनही मुंबई शहरीकरण एक विद्रूप, अस्वच्छ आणि असुरक्षित बनले आहे. योग्य नियोजन केले, तर मुंबई जगासाठी एक आदर्श बनू शकते. ७५ हजार कोटी रुपयांहून अधिक अर्थसंकल्प असलेल्या या पालिकेने केवळ निकृष्ट सेवा दिल्या आहेत. बांधकाम क्षेत्रातील नफा लाटण्यासाठी पालिकेच्या शाळा जाणीवपूर्वक बंद केल्या जात आहेत, अशी टीका आतिशी यांनी केली.
दिल्ली आणि पंजाबप्रमाणेच मुंबईत जागतिक दर्जाच्या सुविधा
आम्ही दिल्ली आणि पंजाबप्रमाणेच मुंबईत जागतिक दर्जाचे मोफत शिक्षण, मोफत आरोग्य सेवा आणि मोफत वीज देऊ. प्रस्थापित पक्षांनी मुंबईकरांचा विश्वासघात केला असून जनहित पेक्षा लोभाला आणि भ्रष्टाचाराला प्राधान्य दिले आहे. मुंबईत प्राथमिक आरोग्य सेवा अस्तित्वातच नाही. आमचा जाहीरनामा हा पर्याय नसून मुंबईची प्रतिष्ठा आणि क्षमता पुनर्संचयित करण्याची ठोस योजना आहे, असा दावा आतिशी यांनी केला.
मुंबईकरांसाठी ४ ‘केजरीवाल गॅरंटी’ कोणत्या?
- मोहल्ला क्लीनिक : मोफत सल्ला, औषधे आणि चाचण्या उपलब्ध करून देण्यासाठी १००० मोहल्ला क्लीनिकची स्थापना.
जागतिक दर्जाचे शिक्षण : पालिका शाळांमध्ये आधुनिक पायाभूत सुविधांसाठी प्रति शाळा १ कोटी रुपयांची तरतूद. सर्व विद्यार्थ्यांना मोफत बेस्ट बस पास आणि प्रत्येक शाळेत सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीनची सुविधा.
- मोफत आणि २४ तास पाणी : प्रत्येक घराला दरमहा २०,००० लिटरपर्यंत मोफत नळ पाणी आणि २४ तास शुद्ध पिण्याच्या पाण्याची हमी. गळती नियंत्रण योजना आणि १०० टक्के सांडपाणी प्रक्रियेसह पाणीपुरवठा व्यवस्थेचा पूर्ण कायापालट.
- शून्य वीज देयक : ‘बेस्ट’द्वारे प्रति कुटुंब २०० युनिटपर्यंत मोफत वीज, मोफत मीटर बसवणे आणि विकेंद्रित सौर ऊर्जेवर भर.