अखेर प्रतिज्ञापत्रे ‘अपलोड’; ‘लोकमत’ने केला पाठपुरावा, उमेदवारांची सगळी माहिती मिळणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 09:08 IST2026-01-08T09:08:42+5:302026-01-08T09:08:42+5:30
महापालिकेला अखेर जाग आली असून, प्रतिज्ञापत्रे अपलोड करण्यात आली.

अखेर प्रतिज्ञापत्रे ‘अपलोड’; ‘लोकमत’ने केला पाठपुरावा, उमेदवारांची सगळी माहिती मिळणार
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : उमेदवारांची प्रतिज्ञापत्र अपलोड करण्यास महापालिकेकडून विलंब झाला होता. ‘लोकमत’ने या संदर्भात सलग दोन दिवस वृत्त प्रसिद्ध केले. त्यानंतर महापालिकेला अखेर जाग आली असून, प्रतिज्ञापत्रे अपलोड करण्यात आली.
मुंबईत नियुक्त २३ निवडणूक अधिकारी कार्यालयानुसार त्या त्या प्रभागातील उमेदवारांची माहिती बुधवारी उशिरापर्यंत अपलोड करण्याची प्रक्रिया महापालिकेतून सुरू होती. त्यातही प्रभाग १३६, १३७, १३८, १३९, पासून १४४ पर्यंत एकही प्रतिज्ञापत्र रात्री उशिरापर्यंत अपलोड झाले नव्हते.
प्रतिज्ञापत्र उपलब्ध न झाल्यामुळे उमेदवारांची आर्थिक शैक्षणिक माहिती मतदारांना कशी मिळणार असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. मात्र, तांत्रिक कारण देऊन महापालिकेकडून याला उशीर करण्यात येत होता. ‘लोकमत’ने याकडे लक्ष वेधून ‘महापालिकेची आयटी यंत्रणा हलेचना’ असे वृत्त प्रसिद्ध केले. तसेच माहिती लपविण्याचा हा गुन्हा आहे का, असा प्रश्नही निवडणूक आयोगाला विचारला. त्यानंतर मंगळवारी प्रतिज्ञापत्र अपलोड करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. बुधवारी सकाळी ती हळूहळू अपलोड झाली. त्यामुळे उमेदवारांची संपूर्ण माहिती मतदारांना मिळणार आहे.