निवडणुकीचे प्रशिक्षण आणि एम.ए.ची परीक्षा एकाच दिवशी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 14:25 IST2026-01-06T14:25:50+5:302026-01-06T14:25:50+5:30
महामुंबई परिसरातील शिक्षकांपुढे संकट उभे राहिले आहे.

निवडणुकीचे प्रशिक्षण आणि एम.ए.ची परीक्षा एकाच दिवशी
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : निवडणुकीच्या कामाचे प्रशिक्षण आणि यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची एम.ए. युनिट १ ची परीक्षा ७जानेवारीला होणार असल्यामुळे महामुंबई परिसरातील शिक्षकांपुढे संकट उभे राहिले आहे.
एम.ए.च्या परीक्षेसाठी शेकडो शिक्षकांनी नोंदणी केली होती. एम.ए.च्या परीक्षेचे वेळापत्रक यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाने १६ डिसेंबर २०२४ ला जाहीर केले. त्यानुसार ७ ते २२ जानेवारी २०२६ पर्यंत ही परीक्षा होणार आहे. मात्र, निवडणुकीच्या कामासंदर्भातील आदेशानुसार ७ जानेवारीला शेकडो शिक्षकांचे प्रशिक्षण आहे. परंतु, त्याच दिवशी 'प्रगत शैक्षणिक तत्त्वज्ञान' हा एम. ए. परीक्षेचा पहिला पेपर आहे.
त्यामुळे शिक्षकांसमोर राष्ट्रीय कर्तव्याला हजर राहावे की परीक्षेला हजर राहावे, असा प्रश्न पडल्याचे शिक्षकांनी सांगितले. परीक्षेला गैरहजर राहिल्यास वर्ष वाया जाईल, तर निवडणूक कामाला गैरहजर राहिल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल. त्यामुळे संबंधित शिक्षकांनी परीक्षेत सवलत मिळावी, अशी मागणी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या परीक्षण नियंत्रकांकडे ई-मेलद्वारे केली आहे.
परीक्षा व निवडणूक प्रशिक्षण याच्या तारखा एकाच दिवशी असल्याचे पत्र शिक्षक संघटनांकडून प्राप्त झालेले आहे. ही बाब तातडीने कुलगुरूंना सांगून त्यावर सकारात्मक निर्णय घेतला जाईल. - बी. पी. पाटील, मुख्य परीक्षा नियंत्रक, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, नाशिक
शिक्षकांना निवडणुकीच्या कामाच्या प्रशिक्षणाचे आदेश डिसेंबरअखेर आणि ३ जानेवारीला मिळाले. एम. ए.ची परीक्षा व प्रशिक्षण एकाच दिवशी आहे. त्यामुळे मुक्त विद्यापीठाच्या उच्च शिक्षणाच्या परीक्षा १६ जानेवारीनंतर घ्याव्यात. - युवराज कलशेट्टी, प्रसिद्धी प्रमुख, पुरोगामी शिक्षक संघटना