मुंबईतील २९ प्रभागांत होत आहेत थेट लढती; अनेक ठिकाणी तिरंगी, चौरंगी लढत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 07:52 IST2026-01-07T07:52:29+5:302026-01-07T07:52:29+5:30
या २९ जागांवर काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीने एकही उमेदवार दिलेला नाही.

मुंबईतील २९ प्रभागांत होत आहेत थेट लढती; अनेक ठिकाणी तिरंगी, चौरंगी लढत
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीत अनेक ठिकाणी तिरंगी, चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे. मात्र २२७ पैकी २९ प्रभागात मात्र थेट लढत होणार आहे. हे २९ प्रभाग हे पश्चिम उपनगर, दक्षिण मुंबई व काही पूर्व उपनगरातील आहेत. या २९ जागांवर काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीने एकही उमेदवार दिलेला नाही.
२०१७ च्या निवडणुकीत या २९ पैकी १३ प्रभाग भाजपकडे होते. तर एकनाथ शिंदे यांच्याकडे गेलेले सहा माजी नगरसेवक सहा प्रभागांमधून निवडून आले होते. उर्वरित प्रभाग उद्धवसेनेकडे आहेत. २०१७ मध्ये काँग्रेसकडून जिंकलेला प्रभाग क्रमांक १४१ मधील माजी नगरसेवक उद्धवसेनेत गेल्याने काँग्रेसने या जागेवर उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला आहे. या २९ प्रभागांमध्ये थेट लढत असल्याने मतविभाजन टळणार आहे. त्यामुळे भाजप आणि शिंदेसेनेच्या युतीविरोधात उद्धवसेना-मनसेचा थेट सामना होणार आहे.
या प्रभागांत थेट लढत
६, ११, १२, १३, १४, १५, १६, १८, १९, २१, २५, ४०, ४६, ८०, ८४, १०६, ११५, ११७, १२८, १३२, १४१, १५३, १७२, १८२, १९१, १९८, २०३, २२६ आणि २२७