Join us
Daily Top 2Weekly Top 5

समाजवादी पक्षात ऐन निवडणुकीत पेटला वाद; रईस शेख, अबू आझमी यांच्यात तू तू मैं मैं

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2026 12:55 IST

ऐन निवडणुकीच्या धामधुमीत हे वाद विकोपाला गेल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : महापालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराला वेग येत असताना समाजवादी पक्षाच्या नेत्यांमधील वाद विकोपाला गेला आहे. प्रदेशाध्यक्ष आ. अबू आझमी व आ. रईस शेख एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत. ऐन निवडणुकीच्या धामधुमीत हे वाद विकोपाला गेल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. 

जागावाटपात एकाधिकारशाही केल्याचा, हुकूमशाही पद्धतीने काम केल्याचा व षडयंत्र रचल्याचा आरोप करणारे पत्र शेख यांनी थेट पक्षाध्यक्ष खा. अखिलेश यादव यांना पाठवले आहे. या पक्षाध्यक्षांनी प्रकाराची गांभीर्याने दखल घ्यावी, अशी मागणी शेख यांनी केली आहे.

मुंबईत पक्षाला चांगले यश मिळण्याची संधी असताना उमेदवारी देताना खासगी कंपनीप्रमाणे वर्तणूक करण्यात आली, राष्ट्रीय नेतृत्वाच्या नावाचा गैरवापर करण्यात आला. या वागणुकीला कंटाळून भिवंडीतील अनेकांनी पक्षत्याग केला. आपल्याला कोणत्याही प्रक्रियेत विश्वासात घेण्यात आले नाही, असे गंभीर आरोप शेख यांनी केले आहेत.

दुसरीकडे, सत्तेच्या लालसेमुळे काही जण विरोधात राहू शकत नाहीत, अशी टीका आझमींनी शेख यांच्यावर केली. मी गेली ३० वर्षे विरोधात आहे. आमच्या पक्षात घराणेशाही चालणार नाही, पक्षाध्यक्ष म्हणून उमेदवार निवडीचा मला अधिकार आहे, असे आझमी म्हणाले.

नेमके प्रकरण काय?

प्रभाग २११ मधून शेख यांचे बंधू सलीम शेख इच्छुक होते. आ. शेख हे भिवंडी पूर्व मधून विधानसभेवर विजयी होण्यापूर्वी याच मतदारसंघातून विजयी झाले होते. त्यामुळे या प्रभागातून भावाच्या उमेदवारीसाठी आग्रही होते. मात्र, आझमींकडून त्यांना नकार मिळाल्यानंतर माघार घेतली.

प्रभाग क्रमांक २११ मधून शेख यांचे स्वीय सहायक व निकटवर्तीय वकार खान यांनी काँग्रेसकडून उभे आहेत. त्यामुळे हा वाद अधिक चिघळला आहे. भिवंडीमध्ये शेख यांनी सुचवलेल्या उमेदवारांचे तिकीट पक्षाने कापल्याने वाद उफाळून आला. 

English
हिंदी सारांश
Web Title : SP feud erupts before election; Sheikh, Azmi clash openly.

Web Summary : Infighting in Samajwadi Party intensifies as Rais Sheikh and Abu Azmi clash over candidate selection and alleged dictatorial practices during the upcoming municipal elections, creating confusion among party workers.
टॅग्स :महानगरपालिका निवडणूक २०२६मुंबई महापालिका निवडणूक २०२६समाजवादी पार्टीअबू आझमी