लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : नव्या जगाशी जोडणाऱ्या उद्योगांची मुंबईत मोठ्या प्रमाणात उभारणी करण्याचे लक्ष्य समोर ठेवत त्यात कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक आणि किमान १६ लाख रोजगारांच्या निर्मितीचे लक्ष्य साध्य केले जात असून त्याची गतिमान अंमलबजावणीही सुरू झाली आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई व परिसरात उद्योगवाढीसाठी झालेले ऐतिहासिक करार, त्याद्वारे होणार असलेली कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक आणि उभा राहणारा मोठा रोजगार याची आकडेवारीच फडणवीस यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. पारंपरिक उद्योगांबरोबरच नव्या जगाशी जोडणाऱ्या उद्योग, व्यवसायांची उभारणी हे लक्ष्य सरकारने ठेवले आहे, असे ते म्हणाले.
पहिले कौशल्य विद्यापीठ
- मुंबई येथे राज्यातील पहिले सार्वजनिक रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ कार्यरत असून, राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार १८ अभ्यासक्रमांद्वारे बिग डेटा, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, सायबर सिक्युरिटी आदी उच्च तंत्रज्ञान क्षेत्रात कौशल्य, पुनःकौशल्य आणि उन्नतीकरण प्रशिक्षण दिले जाते.
- ५५ उद्योगसमूहांबरोबर कराराद्वारे ऑन-द-जॉब ट्रेनिंग आणि आंतरराष्ट्रीय प्लेसमेंट्ससाठी एनएसडीसी इंटरनॅशनलशी सहकार्य केले आहे. आंतरराष्ट्रीय रोजगारासाठी मुंबईत विशेष केंद्र उभारले जाईल.
हे करून दाखविले...
- राज्य शासनाच्या सामूहिक प्रोत्साहन योजनेअंतर्गत मुंबई, पुणे, नाशिकमध्ये २९९ माेठ्या, विशाल व अतिविशाल प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. यातून ६,७०,८७४ कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित असून, मुंबई आणि परिसरात ४,०२,०६५ रोजगार निर्माण होणार आहेत. एकूण राज्यातील ५०१ प्रकल्पांपैकी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आणि रोजगार मुंबई भागात होत आहेत.
- राज्यात सामूहिक प्रोत्साहन योजनेअंतर्गत मागील काही वर्षात १३,७५,२७९ कोटी रुपयांची गुंतवणूक आणि ७,११,२६९ रोजगार अपेक्षित आहेत, त्यात मुंबईचा वाटा सुमारे ४९ टक्के इतका आहे. मुंबईत तंत्रज्ञानावर आधारित उद्योग वाढत असून, कुशल मनुष्यबळाची मागणी वाढली आहे.
- फिल्म, ॲनिमेशन, गेमिंग, म्यूझिक, मीडिया या क्रिएटिव्ह इंडस्ट्रीसह एअरोसिटी, तंत्रज्ञान, एआय क्षेत्राला चालना देण्याबरोबरच मुंबईत जागतिक क्षमता केंद्राच्या ( ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर) उभारणीतून रोजगार निर्मितीला वेग आला आहे. राज्य सरकारची सामूहिक प्रोत्साहन योजना, एव्हीजेसी-एक्सआर धोरण-२०२५, व्हेव्हज शिखर परिषद, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी, एअरोसिटी प्रकल्प, ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर यांसारख्या अनेक योजना आणि उपक्रमांमुळे मुंबईत अंदाजे सात लाखांहून अधिक प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगारांच्या संधी निर्माण झाल्या आहेत.
- सर्जनशील आणि तंत्रज्ञानाधारित क्षेत्रांतून मुंबईत अंदाजे ८.५ लाख रोजगारांच्या संधी उपलब्ध होणार आहेत. महाराष्ट्रातील एव्हीजीसी एक्सआर (ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग, कॉमिक्स आणि एक्स्टेंडेड रिॲलिटी) धोरण-२०२५ मुळे पुढील पाच वर्षांत क्षेत्रातील मूल्य २५,००० कोटी रुपयांवरून ६५,००० कोटी रुपयांपर्यंत वाढण्याची अपेक्षा असून, २ लाख प्रत्यक्ष आणि ३ लाख अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होणार आहेत.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात...
- मुंबईला ‘जागतिक फिनटेक आणि टेक कॅपिटल’ म्हणून ओळख मिळवून देण्याचा आमचा संकल्प सिद्धीस जात आहे. १६ लाखांहून अधिक रोजगार निर्मितीच्या माध्यमातून राज्याच्या अर्थव्यवस्थेला नवी गती दिली आहे.
- ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्ससाठी अनुकूल धोरण राबवल्यामुळे, आज जगातील बड्या कंपन्यांची पहिली पसंती मुंबईला आहे. यामुळे आमच्या तरुणांना मुंबईतच जागतिक दर्जाच्या आणि उच्च पगाराच्या संधी मिळत आहेत.
- आमच्या एव्हीजीसी-एक्सआर धोरणाद्वारे आम्ही या सर्जनशीलतेला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत आहोत. व्हेव्हज शिखर परिषद आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीमुळे मुंबई जगाचे ‘क्रीएटिव्ह हब’ बनत आहे.
- आगामी काळात ८.५ लाख नवीन रोजगार निर्माण होतील. ही क्रांती आमच्या तरुणांच्या काम अन् जागतिक ओळख देईल. एअरोसिटी प्रकल्प मुंबईसाठी रोजगाराचे मोठे केंद्र असेल. केवळ गुंतवणूक हेच ध्येय नसून, रोजगार मेळावे आणि आंतरराष्ट्रीय प्लेसमेंट्सच्या माध्यमातून आमच्या तरुणांना 'ग्लोबल वर्कफोर्स'चा भाग बनवायचे आहे. गुंतवणुकीतून विकास आणि विकासातून रोजगार, हेच आमचे वचन आहे.
आशियातील सर्वात मोठा जीसीसी प्रकल्प
- मुंबईत जागतिक क्षमता केंद्राच्या (ग्लोबल कॅपॅबिलीटी सेंटर) उभारणीतून रोजगार निर्मितीला वेग येणार आहे. ब्रुकफिल्ड कंपनीकडून पवई येथे २० लाख चौरस फूट क्षेत्रफळाचा आशियातील सर्वात मोठा जीसीसी प्रकल्प उभारला जात असून, यातून १५,००० थेट आणि ३०,००० अप्रत्यक्ष असे ४५,००० रोजगार निर्माण होतील. हा प्रकल्प २०२९ पर्यंत पूर्ण होईल आणि १ अब्ज डॉलरपेक्षा अधिक गुंतवणूक अपेक्षित आहे.
- फेडेएक्स आणि मायक्रोसॉफ्टसारख्या कंपन्यादेखील गुंतवणुकीसाठी उत्सुक आहेत. मायक्रोसॉफ्टसोबत आरोग्य, शिक्षण, कृषी आणि सरकारी सेवांसाठी प्रणाली विकसित केली जाईल. कंपनीच्या भारतातील १७ अब्ज डॉलर गुंतवणुकीत महाराष्ट्राला प्राधान्य मिळेल.
रोजगार मेळाव्यातूनही चालना
- मुंबई उपनगर जिल्ह्यात सात रोजगार मेळाव्यांत २,६८७ उमेदवारांचा सहभाग. ६८० जणांची प्राथमिक निवड. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत ५४ आस्थापनांचा सहभाग, हजारो युवकांना प्रशिक्षण. २०२५-२६ साठी २,३७० उमेदवारांना २३ अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट. मुंबई शहर जिल्ह्यात २ रोजगार मेळावे, ३ प्लेसमेंट ड्राइव्ह घेतले.
- मीडिया, मनोरंजन क्षेत्रात ८ हजार कोटींचे करार व्हेव्हज २०२५ या जागतिक शिखर परिषदेत शासनाच्या पुढाकाराने मीडिया व मनोरंजन क्षेत्रात ८ हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार झाले. करमणूक व माध्यम उद्योगातील व्यवसाय, गुंतवणूक व कौशल्य विकासाला चालना मिळाली आहे.
- एमएमआर क्षेत्रातील एअरोसिटी प्रकल्प (२७० हेक्टर, १,१०० कोटी रुपये खर्च) हा मुंबई आणि एमएमआर क्षेत्रात ३ लाख रोजगार निर्माण करेल. यात हवाई क्षेत्र, हॉटेल, रिटेल आणि लॉजिस्टिक्स क्षेत्राचा समावेश आहे.
Web Summary : Mumbai targets massive investment, creating over 16 lakh jobs in emerging sectors. Skill development, global capability centers, and strategic policies drive employment. AVGC sector poised for growth, making Mumbai a global creative hub. Infrastructure projects like Aerocity will generate more jobs.
Web Summary : मुंबई का लक्ष्य भारी निवेश, उभरते क्षेत्रों में 16 लाख से अधिक नौकरियाँ सृजित करना है। कौशल विकास, वैश्विक क्षमता केंद्र और रणनीतिक नीतियाँ रोजगार को बढ़ावा देती हैं। एवीजीसी क्षेत्र विकास के लिए तैयार, मुंबई को एक वैश्विक रचनात्मक केंद्र बना रहा है। एयरोसिटी जैसी बुनियादी ढांचा परियोजनाएं और नौकरियां पैदा करेंगी।