लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: ठाकरे बंधूंनी जाहीर केलेला वचननामा नव्हता तर वाचूननामा होता, अशी खोचक टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी केली. भाजप-शिंदेसेना-आरपीआयच्या उत्तर मुंबईतील ४२ उमेदवारांच्या प्रचारासाठी कांदिवली (पश्चिम) येथील गोरसवाडी मैदानात मुख्यमंत्र्यांची सभा झाली.
वचननामा प्रसिद्ध करण्यासाठी ठाकरे बंधू एकत्र बसले होते तेव्हा ते एकमेकांमध्ये काहीतरी बोलत होते. तेव्हा ते काय बोलत असावेत, याची माहिती काढली तर ते ‘झूठों ने झूठों से कहा सच बोलो. अरे भाई, दो भाई का ऐलान हुआ सच बोलो. घर के अंदर झूठों की एक मंडी है, दरवाजा पर लिखा है सच बोलो’ असे बोलत असल्याचे ते म्हणाले.
मुंबईत २५ वर्षे काम केल्यानंतरदेखील नव्याने पुन्हा त्याच त्याच गोष्टी सांगताना जनाची नाही तर मानाची तरी वाटली पाहिजे, अशीही टीका त्यांनी केली. ‘हा प्रीतिसंगम नाही तर भीतिसंगम असल्याचा टोला त्यांनी लगावला. ही युती म्हणजे कन्फ्युजन आणि भ्रष्टाचाराची युती आहे. विरोधकांचे विकासावर एकही भाषण दाखवा, मी दोन हजार रुपयांचे बक्षीस देईन, असे आव्हान त्यांनी दिले. मुंबईच्या माजी महापौर शुभा राऊळ यांनी यावेळी भाजपमध्ये प्रवेश केला.
‘२० वर्षं झाली, आता जेलमधून बाहेर आल्यासारखं वाटतंय,’ असे राज ठाकरेंनी म्हटले. त्यावर राज ‘मातोश्री’वरून ‘शिवतीर्था’वर गेले, मग शिवतीर्थ जेल समजायचं का? असा खोचक सवाल त्यांनी केला. ‘तुम्हाला जेलमध्ये कोणी पाठवलं? हे तरी सांगितलं पाहिजे. तुम्ही कोणत्या गुन्ह्यात जेलमध्ये गेला होतात? मग आता शिक्षा संपली का?’ असे प्रश्नही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांना विचारले.
मिनी जाहीरनाम्याची खिल्ली
आदित्य आणि अमित ठाकरे यांनी मिनी जाहीरनाम्यात मुंबईत चांगली शौचालये नाहीत, असे म्हटले. यावर हा प्रश्न विचारणाऱ्यांनी घरी बाबा आणि काकांना हा प्रश्न विचारावा, असे मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी आ. अतुल भातखळकर, आ. संजय उपाध्याय, आ. मनीषा चौधरी, आ. योगेश सागर, मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम, उत्तर मुंबई जिल्हाध्यक्ष दीपक तावडे, गोपाळ शेट्टी, भाई गिरकर, आदी उपस्थित होते.
विकास प्रकल्पांचा पाढा
कोस्टल रोड प्रकल्प, मेट्रो, उपनगरीय एसी बंद दरवाजाच्या लोकल, झोपडपट्टीमुक्त मुंबई, नवी मुंबई विमानतळाला मिळणारी कनेक्टिव्हिटी, एसटीपी प्रकल्पामुळे नद्यांना मिळणारी स्वच्छता, ठाणे- बोरिवली बोगदा अशा अनेक विकास प्रकल्पांचा रोड मॅप वाचून मुख्यमंत्र्यांनी दाखवला. आम्ही फक्त ‘करून दाखवले’चे बोर्ड लावत नाही; तर त्यांची जिवंत स्मारके मुंबईकरांसमोर असल्याचेही त्यांनी सांगितले.
Web Summary : Fadnavis criticized the Thackeray brothers' manifesto, calling it a 'read-out.' He questioned their past actions and challenged the opposition to showcase development speeches, offering a reward. He also highlighted ongoing Mumbai development projects.
Web Summary : फड़नवीस ने ठाकरे बंधुओं के घोषणापत्र की आलोचना करते हुए इसे 'पढ़ना' बताया। उन्होंने उनके पिछले कार्यों पर सवाल उठाए और विपक्ष को विकास भाषण दिखाने की चुनौती दी, इनाम की पेशकश की। उन्होंने मुंबई में चल रही विकास परियोजनाओं पर भी प्रकाश डाला।