Join us
Daily Top 2Weekly Top 5

एमआयएमला अध्यक्ष नसला तरी फरक पडत नसल्याचा दावा; जागावाटपावरून मतभेद अन् राजीनामा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 05:43 IST

मुंबई पालिकेच्या निवडणुकीसाठी सर्व पक्षांनी कंबर कसलेली असताना एमआयएम पक्ष मुंबईत अध्यक्षाविना काम करत आहे.

खलील गिरकर, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मुंबई पालिकेच्या निवडणुकीसाठी सर्व पक्षांनी कंबर कसलेली असताना एमआयएम पक्ष मुंबईत अध्यक्षाविना काम करत आहे. पक्षाचे मुंबई अध्यक्ष असलेले फारूक शाब्दी यांनी जागा वाटपावरून झालेल्या वादातून अध्यक्षपदाचा राजीनामा दिला व ते तडक सोलापूरला निघून गेले. तेव्हापासून मुंबईत पक्षाला अध्यक्ष मिळालेला नाही. 

शाब्दी हे एमआयएमचे मुंबई अध्यक्ष तसेच प्रदेश कार्याध्यक्ष म्हणून कार्यरत होते. मुंबईतील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेताना प्रदेशाध्यक्ष माजी खा. इम्तियाज जलील यांच्यासोबत शाब्दीदेखील उपस्थित होते. मात्र, उमेदवार निश्चित करण्यावरून त्यांचे व जलील यांचे मतभेद झाले. त्यामुळे त्यांनी पक्षाचा व पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे मुंबईतील एमआयएम पक्ष नेतृत्वहीन झाला. एमआयएम  मुंबईत ३० जागांवर निवडणूक लढवत आहे. 

कार्यकर्त्यांची घुसमट

मुंबईतील माजी आमदार वारिस पठाण हे पक्षाच्या प्रचारात कार्यरत आहेत, तर प्रदेशाध्यक्ष जलील पुढील टप्प्यात प्रचारात सक्रिय होतील. मात्र, उमेदवारांची मूठ बांधून त्यांना स्थानिक पातळीवर नेतृत्व देणारे अध्यक्ष पद रिक्त असल्याने कार्यकर्त्यांची घुसमट होत आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी यांनी यामध्ये लक्ष घालावे, अशी मागणी कार्यकर्त्यांमधून केली जात आहे.

पक्षाला मुंबई अध्यक्ष नसला तरी पक्षाचे उमेदवार आपापल्या प्रभागात प्रचार करत आहेत. त्यामुळे फारसा काही फरक पडत नाही. आम्ही पक्षाला यश मिळवून देण्यासाठी कार्यरत आहोत. प्रचारासाठी वरिष्ठ नेते मुंबईत येतील. - वारिस पठाण, माजी आमदार- राष्ट्रीय प्रवक्ते

 

English
हिंदी सारांश
Web Title : MIM Faces Leadership Void in Mumbai After President's Resignation.

Web Summary : MIM's Mumbai unit lacks a president after Farooq Shabdi resigned over seat allocation disagreements. Despite this, the party is contesting 30 seats. Waris Pathan claims campaigning continues unaffected, but workers feel a leadership gap.
टॅग्स :महानगरपालिका निवडणूक २०२६मुंबई महापालिका निवडणूक २०२६ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनवारिस पठाण