उमेदवारांनी शपथपत्रात केले निबंध ‘कॉपी पेस्ट’! मराठी उमेदवारांनीही लिहिले इंग्रजीत निबंध
By सीमा महांगडे | Updated: January 10, 2026 07:42 IST2026-01-10T07:42:50+5:302026-01-10T07:42:50+5:30
भावी नगरसेवक पदासाठी निवडणूक लढवणाऱ्या शेकडो उमेदवारांनी जनतेची ही कामे आपल्या प्रतिज्ञापत्रात कॉपी पेस्ट केली आहेत.

उमेदवारांनी शपथपत्रात केले निबंध ‘कॉपी पेस्ट’! मराठी उमेदवारांनीही लिहिले इंग्रजीत निबंध
सीमा महांगडे, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : यंदा पहिल्यांदाच महापालिका निवडणुकीत निवडून येण्याआधी मी नगरसेवक म्हणून काय काम करेन, यासाठी उमेदवारांना निबंध लिहावा लागला. मात्र आपण आपल्या प्रभागात कोणत्या सुविधा प्राधान्याने आणायला हव्यात? पालिकेच्या निधीचा वापर करून नागरिकांचे कोणते प्रश्न सोडवता येतील? कोणते प्रश्न पालिका सभागृहात मांडता येतील या प्रश्नांची उत्तरे चक्क कॉपी पेस्ट केली आहेत. भावी नगरसेवक पदासाठी निवडणूक लढवणाऱ्या शेकडो उमेदवारांनी जनतेची ही कामे आपल्या प्रतिज्ञापत्रात कॉपी पेस्ट केली आहेत.
निवडणुकीला आठवडा शिल्लक असताना पालिकेकडून बुधवारी उमेदवारांची प्रतिज्ञापत्रे अपलोड करण्यात आली. उमेदवारी अर्जात नगरसेवक म्हणून निवडून आल्यावर काय करणार हे उत्सुकतेने पहिले जात आहे. उमेदवारांची प्रभागाविषयी आस्था, जाणीव म्हणून त्याकडे पहिले जात होते. मुंबईत १७०० पैकी अनेक उमेदवारांनी या संधीचा उपयोग करत प्रभागनिहाय समस्या, संभाव्य उपाययोजना आणि कालबद्ध विकास आराखडे मांडले आहेत. मात्र काहींनी या प्रक्रियेकडे केवळ औपचारिकता म्हणून पहिले आहे.
काही निबंध व्हॉट्सॲप ‘स्टेटस’पेक्षाही छोटे
काही निबंध व्हॉट्सॲप ‘स्टेटस’ पेक्षाही छोटे असून, काहींमध्ये एकाच ओळीत ‘विकास दृष्टी मांडली आहे. अनेक निबंधांत मूलभूत विकास , सर्वागीण विकास, महिला सक्षमीकरण आरोग्य सुविधा आणि इंग्रजी शाळांची संख्या वाढवण्यासारखे मुद्दे जसेच्या तसे उतरवले आहेत. हे फक्त अपक्ष किंवा छोट्या पक्षांकडून नाही तर उद्धवसेना, शिंदेसेना, मनसे आणि भाजप उमेदवारांकडूनही हाच कित्ता गिरवण्यात आला आहे.
एजन्सीचीच चर्चा
अनेक उमेदवारांकडून एजन्सीमध्ये एकदाच पैसे घेऊन उमेदवारी अर्ज भरून घेण्यात आले. त्यामुळे अनेक प्रतिज्ञापत्रात सारखे निबंध दिसू लागले आहेत. काही अपक्ष व छोट्या पक्षांच्या उमेदवारांकडून मात्र प्रभागातील समस्या आणि सुविधांवर विस्तृत प्रकाश टाकलेला दिसून आला.
मराठी फक्त प्रचारात, आचारात नाही
निवडणूक आयोगाने उमेदवारांना अर्ज मराठीसह, इंग्रजी भाषेत लिहण्याची मुभा दिली आहे. मात्र राजकीय पक्षांकडून मोठा गाजावाजा करत मराठी भाषा, मराठी माणूस प्रचारात गाजत आहे. मात्र मराठीच्या मद्द्यांवर निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांनी प्रतिज्ञापत्रात निवडून आल्यानंतर करावयाची असताना आपण काय कामे करणार याचे उत्तर इंग्रजीतून लिहिली आहेत. विशेष म्हणजे मराठी उमेदवारांनी देखील प्रतिज्ञापत्रात इंग्रजीमधून निबंध लिहिले आहेत. संपूर्ण प्रतिज्ञापत्र मराठीत भरल्यावर कामे लिहिण्यासाठी इंग्रजीचा सोस का याची उत्तरे उमेदवारचं देऊ शकतील.