उमेदवारांनी साधला रविवारचा मुहूर्त; भेटीगाठी, देवदर्शन, प्रचार फेऱ्यांनी वातावरण निवडणूकमय
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 12:41 IST2026-01-05T12:41:02+5:302026-01-05T12:41:02+5:30
रविवारी अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांची तारेवरची कसरत सुरू होती.

उमेदवारांनी साधला रविवारचा मुहूर्त; भेटीगाठी, देवदर्शन, प्रचार फेऱ्यांनी वातावरण निवडणूकमय
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीच्या २२७ प्रभागांतील उमेदवारी अंतिम झाल्यानंतर पहिल्या रविवारी उमेदवारांनी मतदारांच्या प्रत्यक्ष गाठीभेटींना वेग दिला. सकाळी ७वाजल्यापासूनच उमेदवारांनी मतदारांना गाठणे सुरू केले. त्यात प्रामुख्याने सोसायट्यांच्या बैठका व प्रचार फेऱ्यांचा समावेश होता. प्रचारासाठी मोजकेच दिवस असल्याने रविवारी अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांची तारेवरची कसरत सुरू होती.
प्रमुख राजकीय पक्षांकडून मतदारसंघात आता नेत्यांच्या सभांचे आयोजन करण्यास सुरुवात झाली आहे. त्याद्वारे जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येत आहे. प्रत्येक प्रभागात प्रमुख पक्षाच्या उमेदवारांकडून प्रचार कार्यालयांच्या उद्घाटनाचा धडाकाही सुरू आहे.
रविवार सार्थकी लावण्यासाठी बोरीवली, चारकोप, मालाड, कांदिवली, मागाठाणे आणि दहिसर या उत्तर मुंबईतील मतदारसंघांतील उमेदवारांनी दिवसभर जास्तीत जास्त मतदारांच्या भेटी घेतल्या. काही उमेदवारांनी प्रचार फेऱ्यांऐवजी वैयक्तिक गाठीभेटींवर भर दिला. सोसायट्यांमधील एकगठ्ठा मते मिळवण्यासाठी उमेदवार सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत फिरत होते. त्यानंतर पुन्हा सायंकाळी ५ वाजता प्रचाराला सुरुवात होऊन रात्री १० वाजेपर्यंत पक्षाचे कार्यकर्ते प्रचारात होते.
कार्यालयांच्या उद्घाटनांचा धडाका
उत्तर मुंबईत प्रभाग ९ येथे काँग्रेसच्या मुंबई अध्यक्ष खा. वर्षा गायकवाड यांच्या हस्ते सदानंद चव्हाण यांच्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. सकाळी जुहू बीच येथे भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्यामार्फत अंधेरी आणि सांताक्रूझ येथील स्थानिकांच्या गाठीभेटी घेण्यात आल्या.
वांद्रे पूर्व विधानसभा क्षेत्रातील वॉर्ड ९४ च्या उमेदवार पल्लवी सरमळकर यांच्या निवडणूक कार्यालयासह आणखी भाजप उमेदवारांच्या कार्यालयांचे उद्घाटन उपनगरचे पालकमंत्री आशिष शेलार यांनी केले. प्रभाग १९९ येथे उद्धवसेनेच्या किशोरी पेडणेकर यांनी घरोघरी जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या.
कामांचे दाखले देत मतांचा जोगवा
उमेदवारांची प्रचार फेरी, उद्घाटने, विविध कार्यक्रमांत त्यांच्या प्रभागांचे आमदार आवर्जून उपस्थित असल्याचे दिसून आले. अनेकांनी सकाळी कार्यकर्त्यांसह देवदर्शन घेतले. मतदारसंघात केलेल्या कामांची आठवण करून देत मतांचा जोगवा मागितला जात आहे. नवीन उमेदवार पक्षावरील निष्ठा आणि पक्षाचे काम यावर मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करीत आहेत.