कोकण गाजवल्यावर शिंदेचा फायर ब्रँड नेता मुंबईत; ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात दिली मोठी जबाबदारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 12:31 IST2026-01-01T12:30:28+5:302026-01-01T12:31:38+5:30
BMC Election 2026 Shiv Sena Shinde Group News: एकनाथ शिंदेंच्या या विश्वासू शिलेदाराने मुंबईत येताच ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात बैठका घेण्यास सुरुवात केली आहे.

कोकण गाजवल्यावर शिंदेचा फायर ब्रँड नेता मुंबईत; ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात दिली मोठी जबाबदारी
BMC Election 2026 Shiv Sena Shinde Group News: राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाली. परंतु, युती-आघाडीच्या निर्णयात झालेला उशीर, जागावाटपांचे अडलेले घोडे आणि हातातून निसटून चाललेली वेळ यामुळे संपूर्ण राज्यभरात सर्वच राजकीय पक्षांमध्ये अभूतपूर्व गोंधळाचे चित्र पाहायला मिळाले. मुंबई महानगरपालिका निवडणुकीकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागले आहे. भाजपा आणि शिवसेना शिंदे गट यांनी युती केली आहे. कोकणात मोठी कामगिरी बजावल्यानंतर आता शिवसेना शिंदे गटातील नेत्याला मुंबईत ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंना चितपट करण्यासाठी भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाने जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोकणातील शिलेदार मुंबईत उतरवले आहेत. उदय सामंत, योगेश कदम, भरत गोगावले, निलेश राणे यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. निलेश राणे यांनी नुकतीच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतीची निवडणूक गाजवली. भाजपाला तगडे आव्हान देत मालवणवर शिवसेनेचा भगवा फडकवला, तर कणकवलीत संदेश पारकर यांना नगराध्यक्ष केले. तळकोकणातील निवडणुकीतही निलेश राणे यांना मोठे यश मिळाले आहे. यानंतर आता निलेश राणे ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात स्टार प्रचारक म्हणून काम करणार आहेत.
निलेश राणे मुंबईत आले, कामही सुरू केले
कोकणात नगर पंचायत, नगर परिषेदेच्या निवडणुका गाजवल्यावर निलेश राणे यांनी आता मुंबईवर लक्ष केंद्रीत केले आहे. मुंबईतील शिवडी, लालबाग, परळ, माहीम या परिसरात मूळ कोकणातील असलेल्या रहिवाशांची संख्या मोठी आहे. हाच सगळा परिसर ठाकरेंचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी या परिसरात निलेश राणे यांनी आता धडाकेबाज एन्ट्री करत या परिसरातील नागरिकांच्या भेटीसाठी बैठका सुरू केल्या आहेत.
दरम्यान, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी या परिसरातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी निलेश राणे यांनी लक्ष घातले आहे. वरळी विधानसभेत शिवसैनिकांशी भेटीगाठी घेत निलेश राणेंनी संवाद साधायला सुरुवात केली आहे. शिवसेनेचे संघटन अधिक मजबूत करत या निवडणुकीत महायुतीच्या अधिकृत उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले. निलेश राणेंनी शिवडी विधानसभेतील शिवसेना पदाधिकाऱ्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीला शाखाप्रमुख, विधानसभाप्रमुख, महिला शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, गटप्रमुख तसेच बूथ अध्यक्ष, शिवसैनिक उपस्थित होते.