कार्यालयांच्या उद्घाटनाचा धडाका आणि घरोघरी जाऊन प्रचार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 14:15 IST2026-01-06T14:15:58+5:302026-01-06T14:15:58+5:30
छोट्या पक्षांकडून जनसंपर्कावर अधिक भर

कार्यालयांच्या उद्घाटनाचा धडाका आणि घरोघरी जाऊन प्रचार
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : महापालिका निवडणुकीच्या प्रचारात दिवसेंदिवस रंगत वाढू लागली आहे. उमेदवार निश्चित झाल्याने प्रचाराला वेग येऊ लागला आहे. विविध उमेदवारांनी पक्षनेत्यांच्या हस्ते त्यांच्या प्रचार कार्यालयांचे उद्घाटन करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे पक्षांच्या नेत्यांचेही स्थानिक भागात प्रचार दौरे सुरू झाले आहेत.
प्रचार दौन्यांमधून उमेदवार मतदारांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत. स्थानिक प्रश्न, नागरी सुविधा, पाणी, रस्ते, आरोग्य, शिक्षण यांसारख्या मुद्द्यांवर चर्चा होत आहे. त्यामुळे प्रचार केवळ पोस्टर-बॅनरपुरता न राहता प्रत्यक्ष जनसंपर्कावर भर दिला जात आहे.
समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. अबू आझमी यांनी मानखुर्द विधानसभा मतदारसंघातील प्रभागांवर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. त्याशिवाय इतर ठिकाणी देखील आझमी स्वतः जाऊन उमेदवारांच्या कार्यालयांचे उद्घाटन करत आहेत. नागरिकांच्या समस्या ऐकून त्यावर उपाययोजनांचे आश्वासन देत
मतदारांशी थेट संवाद साधण्यावर त्यांनी भर दिला आहे. पक्षाचे स्टार प्रचारक मुंबईत दाखल झाले असून ते प्रचारात सक्रिय झाले आहेत.
एमआयएम व समाजवादी पक्षाचे मुस्लीमबहुल प्रभागांवर लक्ष केंद्रीत केले आहे.
राष्ट्रवादी (अजित पवार) तर्फे माजी मंत्री नवाब मलिक व आ. सना मलिक हे उमेदवारांच्या प्रचार कार्यालयांचे उद्घाटन करत आहेत. त्यातून संघटन मजबूत करण्यावर पक्षाचा भर आहे. या निवडणुकीत चांगली कामगिरी करण्याचा विश्वास मलिक यांनी व्यक्त केला आहे. महापौर निवडीत आपला पक्ष
महत्त्वाची भूमिका बजावेल, असा दावा त्यांनी केला.
एमआयएमतर्फे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी यांनी गोवंडीमध्ये जाहीर सभा घेत प्रचाराचा नारळ फोडला. ओवेसींनी तेथील उमेदवारांच्या कार्यालयांचे देखील उद्घाटन केले. विकास, प्रतिनिधित्व आणि स्थानिक प्रश्नांवर भाष्य करत त्यांनी कार्यकर्त्यांना जोमाने कामाला लागण्याचे आवाहन केले. एमआयएम व समाजवादी पक्षाने मुस्लिमबहुल प्रभागांवर जास्त लक्ष केंद्रित केले आहे. नेत्यांचे दौरे, सभा आणि मतदारांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत.