५६५ अपक्ष आजमावताहेत नशीब; ४४ प्रभागांमध्ये १०हून अधिक उमेदवारांचे उद्धवसेना, भाजप, मनसेला तगडे आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 13:24 IST2026-01-09T13:24:43+5:302026-01-09T13:24:43+5:30
२०१७च्या पालिका निवडणुकीत मुंबईमध्ये ७१० अपक्ष उमेदवार रिंगणात होते. त्या तुलनेत यंदा अपक्ष उमेदवारांची संख्या घटली आहे.

५६५ अपक्ष आजमावताहेत नशीब; ४४ प्रभागांमध्ये १०हून अधिक उमेदवारांचे उद्धवसेना, भाजप, मनसेला तगडे आव्हान
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मुंबई महापालिकेच्या २२७ प्रभागांमध्ये ५६५ अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. भाजप, मनसे, उद्धवसेना या प्रमुख पक्षांमधील इच्छुकांनी उमेदवारी न मिळाल्याने बंडखोरी करत अपक्ष म्हणून अर्ज भरला आहे. ४४ प्रभागांत १० पेक्षा जास्त अपक्ष उमेदवार प्रमुख पक्षांना लढत देत आहेत. तर, ३३ प्रभागांत एकही अपक्ष उमेदवार नसल्याने येथील पक्षीय उमेदवारांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.
२०१७च्या पालिका निवडणुकीत मुंबईमध्ये ७१० अपक्ष उमेदवार रिंगणात होते. त्या तुलनेत यंदा अपक्ष उमेदवारांची संख्या घटली आहे. प्रभाग १२५ (रमाबाई कॉलनी) मध्ये राजकीय पक्ष आणि अपक्ष मिळून सर्वाधिक २१ उमेदवार निवडणुकीच्या फडात उतरले आहेत.
त्यापाठोपाठ प्रभाग १८८ (आर. पी. नगर) २०, तर प्रभाग ७८ (शिवाजीनगर), प्रभाग १४८ (भारतनगर) व प्रभाग १८१ (कोरबा मिठागर) मध्ये प्रत्येकी १९ उमेदवार रिंगणात आहेत. त्यापैकी प्रभाग १२५ मध्येच ११ अपक्ष रिंगणात आहेत. प्रभाग १४३ (महाराष्ट्रनगर) मध्ये १०, तर सात प्रभागांत प्रत्येकी आठ अपक्ष उमेदवार निवडणूक लढवीत आहेत. सर्वाधिक
स्थानिक प्रश्न, पक्षीय नाराजी
अपक्ष उमेदवारांची ही वाढलेली संख्या स्थानिक प्रश्न, पक्षीय नाराजीचे कारण ठरत आहे. अपक्षांमुळे संभाव्य मतविभाजनाचा धोका टाळण्यासाठी उमेदवारांची मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यामुळे अपक्ष उमेदवारांची भूमिका निर्णायक ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.
१० पेक्षा अधिक उमेदवारांत 'सामना'
दक्षिण मुंबई लोकसभेतील ३२ पैकी पाच प्रभागांत १० पेक्षा जास्त उमेदवार रिंगणात आहेत. प्रभाग १९८, प्रभाग २२६, प्रभाग २२७ येथे दोन उमेदवारांत थेट लढत आहे. तर, ३५ पैकी १३ प्रभागांत १० पेक्षा जास्त उमेदवार आहेत. प्रभाग १९१ वगळता अन्य सर्वच प्रभागांत बहुरंगी लढत होत आहे. उत्तर पूर्व लोकसभेतील ४० पैकी १३, मुंबई उत्तर मध्य लोकसभेतील ४० पैकी नऊ, तर उत्तर मुंबईतील ४२ पैकी चार, तर उत्तर पश्चिमेतील ३८ पैकी पाच प्रभागांत १० पेक्षा जास्त उमेदवार रिंगणात आहेत.